
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा समावेश हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो, हे सर्वांनाच माहिती आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत पुरुषांच्या यादीमध्ये टॉपवर आहेत. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का की भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? अनेकदा तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल की भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? त्यांची संपत्ती किती आहे. चला तर मग आज आपण भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? आणि त्यांची संपत्ती नेमकी किती आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.
फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जिंदाल समुहाच्या प्रमुख आणि हिसारच्या आमदार सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहे. सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 39.6 बिलियन डॉलर एवढी आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 4.1 बिलियन डॉलर एवढी वाढ झाली आहे. 2005 मध्ये सावित्री जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचं निधन झालं, त्यानंतर सावित्री जिंदाल यांनी आपला व्यावसाय आणि राजकारण दोन्ही अगदी समर्थपणे सांभाळलं आहे. सावित्री जिंदाल या दोन टर्म हिस्सारच्या आमदार आहेत, तसेच त्या हरियाणा सरकारमध्ये मंत्री देखील होत्या.
जिंदाल ग्रुपने स्टील, वीज उत्पादन, सीमेंट आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. सवित्री जिंदाल यांचे चिरंजीव सज्जन जिंदाल हे सध्या जेएसडब्ल्यू स्टील, जेएसडब्ल्यू सीमेंट आणि जेएसडब्ल्यू पेंटची जबाबदारी सांभाळतात. तर नवीन जिंदाल यांच्याकडे दिल्ली स्थित व्यावसायाची जबाबदारी देण्यात आली आहे. सवित्री जिंदाल यांनी हिसार विधानसभेसाठी निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरताना सादर केलेल्या शपथ पत्रामध्ये आपल्या संपत्तीचा तपशील दिला होता, त्यानुसार सावित्री जिंदाल यांच्याकडे 48 हजार रुपये रोख आणि वीस कोटी रुपयांचे दागिने एवढ्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला होता, तर सावित्री जिंदाल यांचे चिरंजीव नवीन जिंदाल यांनी देखील 2024 मध्ये भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती, ते भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते.