Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाला जागतिक सलाम; जपानपासून बेल्जियम, डॉमिनिका ते नायजेरियापर्यंत नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Narendra Modi: जपानकडून धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचा संदेश, बेल्जियमकडून संबंध दृढ करण्याची अपेक्षा, डॉमिनिकाकडून वैयक्तिक मैत्रीचा उल्लेख आणि नायजेरियाकडून अधिकृत शुभेच्छा.. या सर्व प्रतिक्रिया मोदींच्या दीर्घ राजकीय प्रवासाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.

Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाला जागतिक सलाम; जपानपासून बेल्जियम, डॉमिनिका ते नायजेरियापर्यंत नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Narendra Modi
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 3:41 PM

Narendra Modi: नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि राजकीय नेतृत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जगभरातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून सुरू झालेला मोदींचा राजकीय प्रवास भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला. या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत भारताच्या विकासाबरोबरच देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान मजबूत करण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची असल्याचं विविध देशांच्या नेत्यांनी आपल्या संदेशांमध्ये नमूद केलं आहे.

जपानच्या पंतप्रधानांकडून मोदींचं कौतुक

जपानच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाबद्दल विशेष शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 2001 पासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना, दीर्घकाळ प्रभावी राजकीय नेतृत्व केल्याबद्दल त्यांनी मोदींचा गौरव केला. भारताच्या समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी मोदी यांनी अनेक वर्षे सातत्याने काम केलं असून, देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा उंचावण्यातही त्यांचं योगदान असल्याचं जपानच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. एका राजकीय नेत्याच्या नात्याने मोदी यांच्या कामगिरीबद्दल आपल्याला मनापासून आदर असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Loading...

यासोबतच भारताच्या जुलै महिन्यातील भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. या दौऱ्यात भारताकडून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारताची खाद्यसंस्कृती आणि संगीताचा अनुभव घेतानाच नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितले. पुढील वर्षी भारत-जपान राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.

बेल्जियमच्या पंतप्रधानांकडूनही अभिनंदन

बेल्जियमच्या पंतप्रधानांनीही नरेंद्र मोदी यांचं 25 वर्षांच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाबद्दल अभिनंदन केलं. गुजरातपासून नवी दिल्लीपर्यंतचा मोदींचा राजकीय प्रवास त्यांनी आपल्या संदेशातून अधोरेखित केला. भारताच्या अलीकडील भेटीचा संदर्भ देत त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

डॉमिनिकाच्या पंतप्रधानांचा ‘माय डिअर फ्रेंड’ म्हणत संदेश

कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना ‘माय डिअर फ्रेंड’ म्हणत शुभेच्छा दिल्या. 25 वर्षांच्या काळात सरकारचे प्रमुख म्हणून सातत्याने सेवा बजावल्याबद्दल त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं. गुजरातपासून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचं नमूद करताना, डॉमिनिकासाठी मोदी यांनी दाखवलेल्या मैत्रीबद्दल आणि तिथल्या नागरिकांसाठी व्यक्त केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले. दोन्ही देशांमधील संबंध आणि मैत्रीपूर्ण बंध अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, शक्ती आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

नायजेरियाकडूनही विशेष संदेश

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या वतीनेही नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या नेतृत्वानिमित्त विशेष संदेश जारी करण्यात आला. गुजरातमधील मुख्यमंत्रीपदापासून भारताच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा या संदेशात उल्लेख करण्यात आला आहे. नायजेरिया आणि भारत यांच्यातील संबंधांच्या दृष्टीनेही मोदी यांच्या नेतृत्वाला महत्त्व दिले जात आहे. भारताचा जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव आणि आफ्रिकन देशांशी भारताचे वाढते संबंध पाहता, नायजेरियाकडून आलेला हा संदेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

भूतानच्या माजी पंतप्रधानांकडून भावनिक आठवणी

भूतानचे माजी पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा देत त्यांचं नेतृत्व ज्ञान, धैर्य आणि सहानुभूतीचे प्रतिबिंब असल्याचं म्हटलं आहे. 2019 मध्ये मोदी यांची भेट घेतल्यापासून त्यांच्याबद्दल असलेल्या आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मोदी यांच्यातील साधेपणा, आपुलकी आणि नेतृत्वगुणांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांना केवळ राजकीय नेता नव्हे, तर मोठ्या भावाप्रमाणे मानत असल्याचं सांगितलं.

भूतानच्या विकासासाठी भारताकडून मिळालेल्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला. भारताने भूतानला विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिलेली मदत, ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञानातील सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मते, मोदींच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये केवळ राजकीय निर्णयांमध्ये नाहीत, तर इतर देशांबरोबरचे संबंध, विकासाची दृष्टी आणि सामान्य जनतेसाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातही दिसून येतात.

२५ वर्षांचा प्रवास, जागतिक पातळीवर उमटलेला ठसा

नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा मोठा टप्पा दिसून येतो. या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेपासून पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, परराष्ट्र धोरण आणि जागतिक कूटनीतीपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडले. त्यामुळेच मोदींच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाची दखल केवळ भारतातच नव्हे, तर विविध देशांच्या नेत्यांनीही घेतल्याचं या शुभेच्छा संदेशांमधून दिसून येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us