
Narendra Modi On Operation Sindoor : संसदेत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामवर झालेला दहशतवादी हल्ला यावर चर्चा चालू आहे. सोमवारपासून चालू झालेल्या या चर्चेत विरोधकांकडून मोदी सरकारच्या धोरणांवर बोट ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकारने या काळात किती चोखपणे काम केले, हे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत भारताच्या सैन्याची भूमिका, या काळात सरकारची भूमिका याबाबत सविस्तर सांगितलं. तसेच पहलगामवर हल्ला करून भारतात दंगल घडवून आणण्याचा डाव होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मी हे भारताच्या विजयोत्सावचं अधिवेशन असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा विजयोत्सवाची गोष्ट सांगतो तेव्हा हा विजयोत्सव दहशतवाद्यांच्या हेडक्वॉर्टरला मातीत घालण्याचा आहे. हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा आहे. भारताच्या सैन्य आणि शौर्याच्या विजयाची गाथा आहे. १४० कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्ती, त्यांच्या अप्रतिम विजयाची गोष्ट मी सांगत आहे, असं मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं.
मी याच विजयी भावाने या सभागृहात भारताची बाजू मांडण्यासाठी उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. मी १४० देशवासियांच्या भावनेत आपला स्वर मिसळण्यासाठी मी उभा आहे. १४० कोटी भारतीयांची गुंज सभागृहात घुमत आहे. त्यात मी माझा स्वर मिसळत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या प्रकारे देशाच्या लोकांनी मला साथ दिली, मला आशीर्वाद दिले, देशाच्या जनतेचं माझ्यावर कर्ज आहे. मी देशवासियांचे आभार व्यक्त करत आहे. मी देशवासियांचं अभिनंदन करत आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगामला ज्या प्रकारे क्रूर घटना घडली, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निर्दोष लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या मारल्या ही क्रूरतेची पराकाष्ट होती. भारताला हिंसेत लोटण्याचा हा डाव होता. भारतात दंगल भडकवण्याचे हे षडयंत्र होते, असे मोदी यांनी सांगितले. तसेच देशाने एकतेसोबत हे षडयंत्र हाणून पाडले असे म्हणत मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले.