इंग्रजीतून शपथ घेणं हे सुजय विखेंना उत्तर आहे का?; निलेश लंके म्हणाले, माझ्यासाठी…

Nilesh Lanke on Sujay Vikhe Patil : खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेतून खासदारकीची शपथ घेतली आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेणं हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनवा आहे. या सगळ्यावर खासदार निलेश लंके यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर....

इंग्रजीतून शपथ घेणं हे सुजय विखेंना उत्तर आहे का?; निलेश लंके म्हणाले, माझ्यासाठी...
निलेश लंके, सुजय विखे पाटील
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 25, 2024 | 4:58 PM

आज 18 व्या संसदेच्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी अनेकांनी मातृभाषेतून शपथ घेतली. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. मात्र अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी मात्र इंग्रजी भाषेतून शपथ घेतली आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेणं ही घटना राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर म्हणून निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्याची चर्चा होत आहे. यावर स्वत: खासदार निलेश लंके यांनी उत्तर दिलं आहे.

निलेश लंके काय म्हणाले?

सुजय विखे यांनी आव्हान दिल्यानंतर निलेश लंके यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी इंग्रजीतून शपथ घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर निलेश लंके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना उत्तर दिलं आहे. त्यांना उत्तर दिलं असं म्हणता येणार नाही. पण इंग्रजी बोलणं माझ्यासाठी अवघड नव्हतं, असं निलेश लंके म्हणाले.

निवडणुकीच्या वेळीच मी ठरवलं होतं की, संसदेत जाईल. तेव्हा पहिल्यांदा इंग्रजी भाषेत बोलणार आहे. त्याप्रमाणे मी आज इंग्रजी भाषेत शपथ घेतली. विरोधी नेत्याला हे उत्तर म्हणता येणार नाही. पण माझ्यासाठी इंग्रजी बोलणं अवघड नव्हतं, असं निलेश लंके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं. निलेश लंके यांचा शपथविधी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

सुजय विखे यांनी काय आव्हान दिलं होतं?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळाव्यात सुजय विखे पाटील यांनी एक विधान केलं होतं. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं होतं. सुजय विखे संसदेत इंग्रजीत भाषण करतानाचा एक व्हीडिओ या मेळाव्यात दाखवण्यात आला होता. तेव्हा समोरच्या उमेदवाराने एक महिना पाठांतर करून तरी असं इंग्रजी बोलून दाखवलं तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते. त्यांचं हे विधान अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलं.