
केंद्र सरकारने देशाला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी 31 मार्च 2026 ही अखेरची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशातच आता सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात दोन प्रमुख नक्षलवादी कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. या दोन्ही कमांडर्सवर प्रत्येकी 40-40 लाख रुपयांचे बक्षीस होते. राजू दादा उर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी (वय 63) आणि कोसा दादा उर्फ कादरी सत्यनारायण (67) अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. हे दोघे सरकारने बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) केंद्रीय समितीचे सदस्य होते.
सुरक्षा दलाच्या या कामगिरीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियाद्वारे भाष्य केले आहे. अमित शाह यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज आपल्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठा विजय मिळवला आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या नारायणपूरमधील अभुजमाड भागात, आमच्या सुरक्षा दलांनी कट्टा रामचंद्र रेड्डी आणि कादरी सत्यनारायण रेड्डी या दोन केंद्रीय समितीच्या नक्षलवादी नेत्यांना ठार केले. सुरक्षा दल बड्या नक्षलवादी नेत्यांना संपवत आहेत, ज्यामुळे रेड टेररचा कणा मोडला जात आहे.’
Today, our security forces have achieved another major victory against the Naxalites. In the Abujhmad region of Narayanpur along the Maharashtra-Chhattisgarh border, our forces eliminated two Central Committee Member Naxal leaders – Katta Ramachandra Reddy and Kadri Satyanarayan…
— Amit Shah (@AmitShah) September 22, 2025
आजच्या कारवाईबाबत बोलताना नारायणपूरचे पोलिस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी म्हटले की, ‘आज सकाळी महाराष्ट्र सीमेजवळील अभुजमाड जंगलात ही कारवाई करण्यात आली, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता, त्यात दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलांना परिसरातील नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. चकमकीनंतर, नक्षलवादी नेत्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून अनेक शस्त्रे देखील जप्त केली आहेत. यात एके-47 रायफल, एक इन्सास रायफल, एक सिंगल-बॅरल ग्रेनेड लाँचर, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि नक्षलवादी साहित्य यांचा समावेश आहे. आता आगामी काळात उर्वरित नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.