ना सुनेत्रा पवार, ना पार्थ पवार… विधान परिषद निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
विधान परिषद निवडणुकीतील अपयश आणि अंतर्गत कुरबुरीनंतर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. या भेटीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह असताना झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत.

प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी : विधान परिषदेच्या निवडणुकीत अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीला प्रचंड अपयश आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. हे चित्र असतानाच राष्ट्रवादीच्या टॉपच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपचे नेते अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीवेळी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नव्हते. या दोघांना वगळून ही भेट झाली आहे. भेटीचा फोटोही व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात येत्या काळात काही राजकीय घडामोडी घडणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांनी काल रात्री नवी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती हे समजू शकले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यावर भाष्य केलं नाही. मात्र, राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्व टॉपचे नेते अचानक अमित शाह यांना भेटल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
सुनेत्रा पवार आणि पार्थ नव्हते
या भेटीच्यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापैकी कोणीच नव्हतं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट करून पक्षाला घरचा आहेर दिला होता. त्यांनी पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली होती. पटेल यांनी एकप्रकारे पक्ष नेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर ही भेट झाल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
भेटीची गुप्तता
दरम्यान, ही भेट गुप्तपणे झाल्याचं सांगण्यात येत आहे. कारण अमित शाह यांना भेटणाऱ्या नेत्यांनी भेटीचा फोटो किंवा भेटीची माहिती आपल्या एक्स अकाउंटवर अजूनही दिलेली नाही. त्यामुळे ही भेट गुप्त होती असं सांगितलं जात आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत अमित शाह यांच्यासोबत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसं पत्र शाह यांना दिल्याचंही सांगितलं जात आहे.
आज कोअर कमिटीची बैठक
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत आजच्या भेटीवर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.