डीलिमिटेशन विधेयक मंजूर करणं अवघडच, 6 पक्ष ठरणार किंगमेकर, जाणून घ्या संपूर्ण गणित!
NDA ला लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश बहुमताची अडचण येत आहे. महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. शरद पवार गट आणि डीएमके सोबत आले तरी 10 खासदारांची कमी भासणार आहे. अशावेळी, कोणत्याही आघाडीत नसलेले सहा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतात, ज्यांच्या पाठिंब्यावरच विधेयकांचे भवितव्य अवलंबून आहे.

लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करणं एनडीएला अजूनही अवघड असल्याचं दिसून येत आहे. दोन्ही विधेयकं मंजूर करण्यासाठी एनडीएला दोन तृतियांश बहुमताची गरज आहे. स्वबळावर एनडीए हे विधेयक मंजूर करू शकत नाही. त्यामुळे एनडीएला इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. मात्र, एनडीए बाहेरच्या कोणत्याही राजकीय पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याची अद्याप घोषणा केलेली नाही. तसेच पाठिंबा देण्याचे संकेतही दिलेले नाहीत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएला फक्त सहा खासदारांची कमी पडत आहे. विशेष म्हणजे संसदेत सहा राजकीय पक्ष असे आहेत की ते कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यामुळे हे सहाही राजकीय पक्ष किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचं चित्र आहे.
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. मागचं पावसाळी अधिवेशन सरकारने स्थिगत केलं होतं. तेच कंटिन्यू होणार आहे. सरकारने अधिवेशनाची घोषणा केल्यानंतर अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि डीलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, एनडीएने आपली आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. सध्या तरी एनडीएकडे अधिकृतपणे केवळ 320 खासदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारला अजून 41 खासदारांची गरज आहे.
दोन पक्ष सोबत येणार?
शरद पवाह गटाची राष्ट्रवादी आणि डीएमके संसदेत मोदी सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा केलेली नाही. पण तसे संकेत मिळत आहेत. परिसीमन विधेयक देशाच्या हिताचं असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबाच राहील, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडी त्यावर विचार करेल, असंही त्या म्हणाल्या होत्या.
दुसरीकडे डीएमकेने अटी आणि शर्तींवर या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डीएमकेच्या नेत्यांनी हे सुतोवाच केलं आहे. प्रत्येक मुद्द्यावर भाजपला विरोध करण्याची गरज नाहीये. जर तामिळनाडूची भागिदारी 7.2 टक्के राहण्याचं वचन मिळत असेल तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ शकतो, असं डीएमकेच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
दोघे सोबत आल्यास…
एनडीएकडे सध्या 320 खासदारांचं बळ आहे. अशावेळी पवार गट आणि डीएमके सोबत आल्यास हा आकडा 350 वर जाणार आहे. त्यानंतरही एनडीएला 10 खासदारांची गरज उरणार आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी 360 खासदारांची आवश्यकता आहे. लोकसभेच्या तीन जागा रिक्त आहेत. तसेच अध्यक्षांना विना मतदान करणाऱ्यांची संख्या 539 होते.
एनसीपी आणि समाजवादी पार्टीकडे लोकसभेत एकूण 8 खासदार आहेत. डीएमकेचे 22 खासदार आहेत. एकीकडे एनसीपीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूत डीएमकेचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने टीव्हीकेला साथ दिली होती. त्यामुळे डीएमके नाराज आहे.
बहुमत कसं होणार?
संविधानाच्या अनुच्छेद 368मध्ये संविधान दुरुस्ती नियमावर भाष्य करण्यात आलेलं आहे. दुरुस्ती विधेयकासाठी एकूण सदस्य संख्येचे बहुमत आणि उपस्थित तसेच मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या कमीत कमी दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. अशा तऱ्हेने मतदारानाच्यावेळी सभागृहात 529 सदस्य वा त्यापेक्षा कमी सदस्य असल्यास सरकार आवश्यक बहुमत मिळवू शकते. पण याबाबत अद्याप कुणीच काही सांगितलेलं नाही. केवळ या बाबतच्या चर्चाच सुरू आहेत.
सहा पक्ष ठरणार किंगमेकर?
मीडिया रिपोर्टनुसार, युवजन श्रमिक रयुथू काँग्रेस पार्टी म्हणजे वायएसआरसीपीने यापूर्वी अनेक मुद्द्यांवर भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांचे एकूण 4 खासदार आहेत. त्यामुळे यावेळीही वायएसआरसीपी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. YSRCP चा पाठिंबा मिळाल्यानंतर एनडीएचा आकडा 354 होईल. त्यानंतर त्यांना आणखी 6 खासदारांची गरज भासणार आहे. संसदेत आम आदमी पार्टी, एमआयएम, अकाली दल वारिस पंजाब दे, यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरल, जोरम पीपल्स मुव्हमेंट, इंजीनिअर राशिद या पक्षांसह एक अपक्ष खासदार आहे. हे सर्व पक्ष कोणत्याही आघाडीचा भाग नाहीत. त्यामुळे हे 6 पक्ष सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरच भाजपला ही दोन्ही विधेयकं मंजूर करता येणार आहेत. त्यासाठी भाजप काय प्रयत्न करणार? आणि हे सहा पक्ष काय भूमिका घेणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.