नव्या संसद भवनाच्या उद्धाटनाच्या दिवशी कुस्तीपटू करणार ‘दंगल’; महिला महापंचायतीचं आयोजन

| Updated on: May 24, 2023 | 8:31 AM

Wrestlers Protest Agaist Brij Bhushan Sharan Singh : नव्या संसद भवनाच्याच्या उद्धाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंचं आंदोलन; होणार महिलांची महापंचायत

नव्या संसद भवनाच्या उद्धाटनाच्या दिवशी कुस्तीपटू करणार दंगल; महिला महापंचायतीचं आयोजन
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचं दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. आता हे आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. नव्या संसद भवनाचं 28 मेला उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी या पैलवानांनी महापंचायतीचं आयोजन केलं आहे.

28 मेला नव्या संसदभवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी या नव्या संसदभवन परिसरात पैलवानांचं आंदोलन होणार आहे.

काल या पैलवानांनी जंतर-मंतरपासून इंडिया गेटपर्यंत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी न्यायाची मागणी केली. 28 मार्चला आम्ही नव्या संसद इमारतीच्या समोर महिला महापंचायतीचं आयोजन केलं आहे. ही महापंचायत शांततापूर्ण मार्गाने होईल, असं कुस्तीपटू विनेश फोगाटने यावेळी सांगितलं.

या महापंचायतीचं नेतृत्व महिला करणार आहेत. आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला आहे. तो सरकारपर्यंत जायला पाहिजे. देशातील मुलींना आता न्याय मिळाला तर येणाऱ्या पिढ्या यातून प्रेरणा घेतील, असंही विनेश फोगाटने यावेळी म्हटलं.

कुस्तीपटूंचं आंदोलन

विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह अन्य पैलवान मागच्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. 23 एप्रिलपासून जंतर मंतरवर पैलवान आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे.

सर्वोच्च न्यायलयात याचिका

बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिला पैलवान आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. 28 एप्रिलला दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलीची तक्रार पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली आहे.

महिला पैलवानांच्या तक्रारी विरोधात दिल्ली पोलिसांनी एसआयटी गठीत केली आहे. पैलवानांच्या या तक्रारीवर निर्णय होत नाही तोवर क्रिडा मंत्रालयाने आपले कार्यक्रम रद्द केले आहेत.