ISI, लष्कर आणि पोनीवाले… पहलगाम हल्ल्यात मोठा ट्विस्ट; आतापर्यंत NIAच्या हाती काय काय लागलं?

पहलगाम येथील हल्ल्याच्या तपासात एनआयएने महत्त्वाचे खुलासे केले आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) आणि लष्कर-ए-तोयबा यांचा हल्ल्यात हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. एनआयएने 2800 हून अधिक लोकांची चौकशी केली असून, स्थानिक पोनीवाल्यांवरही संशय व्यक्त केला आहे. हल्ल्यात वापरलेल्या साधनांचा आणि दहशतवाद्यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संपर्काचाही तपास सुरू आहे.

ISI, लष्कर आणि पोनीवाले... पहलगाम हल्ल्यात मोठा ट्विस्ट; आतापर्यंत NIAच्या हाती काय काय लागलं?
NIA team
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2025 | 1:38 PM

पहलगाम येथील हल्ल्याचा तपास करण्यासाठी काल एनआयएची टीम बैसरन घाटीत पोहोचली होती. दुसरीकडे एनआयएच्या महासंचालकांनी श्रीनगरमध्ये आढावा बैठक घेतली. पहलगाम येथील हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा हात असल्याची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे एनआयएच्या चौकशीत नवा ट्विस्ट आला आहे. एनआयएच्या हाती लागलेल्या पुराव्यामुळे स्थानिक पोनीवाले म्हणजे घोडेवाल्यांची भूमिकाही संशयाच्या फेऱ्यात आली आहे. या पोनीवाल्यांनीच दहशतवाद्यांना मदत केली होती, असा एनआयएला संशय असून त्या दिशेने तपास सुरू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेक पोनी रायडर्सना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे पोनीवाल्यांनी दिलेली कबुली आणि माहिती एकमेकांशी मेळ खात नाही. सर्वच पोनीवाले वेगवेगळी कथा सांगत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांच्यावर संशय होत आहे. या पोनीवाल्यांनी तर अतिरेक्यांना वरती येण्यासाठी आणि बैसरन घाटीत एन्ट्री देण्यासाठी मदत तर केली नाही ना? असा संशय बळावला आहे. त्यामुळे या पोनीवाल्यांची कसून चौकशी केली जात आहे. एनआयएची टीम आता या पोनीवाल्यांचे फोन कॉल्सची डिटेल्स तपासत आहे. तसेच त्यांची लोकेशन हिस्ट्रीही चेक केली जात आहे.

पाकिस्तानी आकाच्या संपर्कात

एनआयएच्या टीमने आतापर्यंत स्थानिक पोनीवाल्यांसह जवळपास 2800 लोकांची चौकशी केली आहे. दहशतवाद्यांचा येण्याजाण्याचा मार्ग काय होता हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अतिरेक्यांनी बैसरन घाटीत प्रवेश कसा केला? याचीही माहिती घेतली जात आहे. या हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मूला आणि अली भाई पाकिस्तानातील राहणारे आहेत. हे दोघेही हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानातील त्यांच्या आकाच्या संपर्कात होते. यावेळी त्यांना पाकिस्तानातून सूचना केल्या जात होत्या, अशी माहितीही एनआयएच्या हाती लागली आहे.

2800 लोकांची चौकशी, 150 ताब्यात

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, एनआयएने आतापर्यंत 2800 लोकांची चौकशी केली आहे. तसेच याशिवाय 150 लोकांना ताब्यात घेतलं आहे. एनआयएच्या टीमने घटनास्थळी जाऊन केवळ 3D मॅपिंग केलं नाही तर डंप डेटाही घेतला आहे. त्यावरून या ठिकाणी कोण कोण होतं आणि ते कुणाकुणाच्या संपर्कात होते ही माहिती मिळणार आहे. तपास यंत्रणेला घटनास्थळी 40 हून अधिक काडतूसांचे खोके सापडले आहेत. हे काडतूस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

कुणाकुणाच्या साक्षी घेतल्या?

तपास यंत्रणेने याशिवाय बैसरन घाटीत काम करणारे फोटोग्राफर्स, दुकानदार, टुरिस्ट गाईड, जिप लाइन वर्कर्स, हॉटेल मालक आणि इतरांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेज पाहून दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच त्यांना वापरलेल्या सॅटेलाइट फोनचाही तपास केला आहे. दहशतवाद्यांनी हल्ला घडवण्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी रेकी केली होती, त्या घटनास्थळांचीही पाहणी करण्यात आली आहे. त्याशिवाय तपास यंत्रणांनी प्रतिबंधित हुर्रियत आणि जमात इस्लामीशी संबंधित लोकांच्या ठिकाणीही छापेमारी केली आहे.