FASTag चा हा पास घेतला तर वर्षभराच्या टोलचं टेन्शन मिटेल; नितीन गडकरींची घोषणा, जाणून घ्या किंमत

देशातील हा ऐतिहासिक उपक्रम येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. एक नवीन फास्टॅग पास प्रमाणी सुरू केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दलची माहिती दिली. हा पास एक वर्षासाठी वैध असेल.

FASTag चा हा पास घेतला तर वर्षभराच्या टोलचं टेन्शन मिटेल; नितीन गडकरींची घोषणा, जाणून घ्या किंमत
Nitin Gadkari
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2025 | 2:58 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी टोल टॅक्स नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा घोषणा केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सरकार आता खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी करणार असल्याची माहिती गडकरींनी बुधवारी ट्विटरद्वारे दिली. या पासची किंमत 3 हजार रुपये असेल. येत्या 15 ऑगस्टपासून ही पास प्रणाली सुरू होईल. या पासमुळे खाजगी वाहन मालकांना राष्ट्रीय महामार्गांवर कमी खर्चात आणि त्रासमुक्त प्रवास करता येईल. 3000 रुपयांमध्ये FASTag पास बनवला जाईल. या पासअंतर्गत वाहन मालकांना एका वर्षात जास्तीत जास्तीत 200 वेळा टोलमधून जाता येईल.

नितीन गडकरी यांनी ट्विटरवर लिहिलं, ’15 ऑगस्ट 2025 पासून 3000 रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जात आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत (जे आधी होईल ते) वैध असेल. हा पास विशेषत: गैर व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यासाठी सक्षम असेल.’

टोल पासबाबत काय नियम असेल?

यापुढे त्यांनी म्हटलंय, ‘वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर लवकरच एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे प्रक्रिया आणखी सोपी आणि सुलभ होईल.’ फास्टॅग पासमुळे रांगेत प्रतीक्षा करण्याची वेळसुद्धा कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामुळे टोल नाक्यावरील वाहनांची रांगही कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

नवीन पास सिस्टिमचा काय फायदा होईल?

नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश हा 60 किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांशी संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणं आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे पेमेंट सोपं करणं, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करणं, गर्दी कमी करणं आणि वाद दूर करणं हे त्याचे प्रमुख फायदे आहेत. या घोषणेमुळे लाखो खाजगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.