Nitish Kumar : इकडं काडीमोड तिकडं लगेच सत्तेचं बाशिंग, नितीशकुमारांची महागठबंधनच्या नेतेपदी निवड

| Updated on: Aug 09, 2022 | 5:30 PM

नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे विराजमान होणार आहेत. शिवाय मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात राजद त्यांच्याकडे अनेक महत्वाची खाती ठेवणार आहे.

Nitish Kumar : इकडं काडीमोड तिकडं लगेच सत्तेचं बाशिंग, नितीशकुमारांची महागठबंधनच्या नेतेपदी निवड
इकडं काडीमोड तिकडं लगेच सत्तेचं बाशिंग, नितीशकुमारांची महागठबंधनच्या नेतेपदी निवड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पाटणा : जेडीयू (JDU) आणि भाजपची (BJP) युती तुटल्याने बिहामधील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर बिहारमध्ये नवी आघाडी तयार झाली आहे. एवढचं नाही. तर इकडे काडीमोड झाल्या झाल्या लगेच सत्तेची बाशिंगही बाधली जात आहेत. कारण नितीशकुमारांची महागठबंधनच्या नेतेपदी निवडही जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे विराजमान होणार आहेत. शिवाय मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात राजद त्यांच्याकडे अनेक महत्वाची खाती ठेवणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. शिवाय या नव्या सरकारला काँग्रेसचीही मोठी साथ मिळाली आहे.

बिहारमध्ये कुणाची ताकद किती?

बिहार विधानसभा निवडणुकीत राजद हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राजदला तब्बल 79 जागा मिळाल्या होत्या. मात्र तरीही विरोधात बसावं लागलं होतं. तर बिहार विधानसभेत भाजपला 77 जागा, जेडीयू 45, मिळाल्या होत्या. यात काँग्रेस 19, सीपीआयएमएल (एल) नेतृत्वाखालील डावे 16 आहेत. बिहारमधील एकूण संख्याबळ हे 242 आहे. यातली एक जागा सध्या रिक्त आहे.

किती आमदारांचा नव्या सरकारला पाठिंबा?

यातल्या 164 आमदारांचा या नव्या आघाडीला पाठिंबा असणार आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे, जेडीयू 45, राजद 79, काँग्रेस 19, हमच्या 4 आणि डावे 16 आणि एक अपक्ष असा समावेश या नव्या सरकारमध्ये असणार आहे.

कुणाकडे कोणती पदं?

नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेस आमदार शकील अहमद खान यांनी म्हटलं आहे. सर्व काही ठरलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. तसेच गृहमंत्रिपदही राजदकडेच असणार आहे, काँग्रेसला सभापतीपद मिळू शकते, असेही सांगण्यात येत आहे.

बिहारची जनता माफ करणार नाही-भाजप

नितीश कुमार यांनी एनडीएपासून फारकत घेतल्यानंतर भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की आम्ही 74 जागा जिंकून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार झालो होते, पण आम्ही आश्वासन पाळले आणि एनडीए आघाडीच्या वतीने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. आज जे काही झाले ते जनतेच्या त्या जनादेशाचा विश्वासघात आहे. बिहारची जनता याला माफ करणार नाही.

चिराग पासवान यांची सडकून टीका

गेल्या 8 वर्षात नितीशकुमार यांनी तीन आघाड्या बदलल्या. 2017 मध्ये जेव्हा नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये परतले, तेव्हापर्यंत, त्यांच्यासाठी बिहारमध्ये राज्य करण्याची ही एक सुंदर संधी होती. बिहारच्या विकासासाठी आम्ही डबल इंजिन सरकारचा फायदा घेऊ शकतो. जी व्यक्ती मुख्यमंत्री पदाला न्याय देत नाही ती पंतप्रधानांचा उमेदवार कशी बनू शकते? असा सवाल करत चिराग पासवान यांनी या नव्या सरकारवर निशाणा साधला आहे.