बोगद्यात भीषण अपघात, तो रस्त्यावर पडून होता, पण नेटवर्क नसल्याने मदत मिळाली नाही अन् तरूणाने गमावला जीव

| Updated on: May 25, 2023 | 12:44 PM

Delhi Road Accident : प्रगती मैदानाजवळी झालेल्या अपघातात एका तरूणाला जीव गमवावा लागला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरूणाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

बोगद्यात भीषण अपघात, तो रस्त्यावर पडून होता, पण नेटवर्क नसल्याने मदत मिळाली नाही अन् तरूणाने गमावला जीव
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून सरकार रस्ते, पूल, बोगदे बांधत आहे, पण अनेक वेळा या सुविधा मानवासाठी घातक ठरू शकतात. प्रगती मैदान बोगद्यातून जाताना राजन राय याच्याबाबतही असेच काहीसे घडले. सोमवारी १९ वर्षीय राजनचा प्रगती मैदान बोगद्यात अपघात (accident) झाला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली अन् वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला. खरंतर बोगद्यात नेटवर्क नसल्यामुळे पोलिसांना अपघाताची माहिती योग्य वेळी मिळू शकली नाही. अपघाताची माहिती उशिरा मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्री राजन मेरठहून परत येत होता आणि दिल्लीतील उत्तम नगर येथील आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत व्यक्तीच्या डोक्याला मार लागला होता, खूप रक्त सांडलं होतं. या तरुणाने हेल्मेट घातले असले तरी अपघातात त्याचे हेल्मेट पूर्णपणे निकामी झाले होते.

15 मिनिटे मिळाली नाही कोणतीही मदत

प्रगती मैदान बोगद्याच्या आत नेटवर्क येत नाहीत. त्यामुळे बोगद्यातून जाताना कोणताही कॉल लावत येत नाही किंवा रिसीव्हही करता येत नाही. राजनच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. सोमवारी राजन बोगद्यातून जात असताना त्याचा अपघात झाला. बोगद्याच्या आत कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पीसीआरला कॉल करण्यासाठी 15 मिनिटे लागली. त्यामुळे पोलिस वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि तरुणावर उपचार होऊ शकले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे बोगद्यात बसवण्यात आलेली एसओएस यंत्रणाही काम करत नाही.

राजन इंडिया गेटच्या दिशेने कॅरेजवेने जात असताना अचानक दुचाकी उलट्या दिशेने वळली आणि क्रॅश बॅरीअर्सना टक्कर होऊन दुसऱ्या बाजूला वळला आणि राजन रस्त्यावर पडले, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. बोगद्यात उपस्थित सुरक्षा कर्मचारी राजनला येणाऱ्या वाहतुकीपासून वाचवण्यात व्यस्त होते. तेथे उपस्थित असलेले लोक सतत पोलिसांना फोन करत होते पण कॉल काही लागला नाही. उपचारांसाठी उशीर झाल्याने राजनला जीव गमवावा लागला. दुसरीकडे, राजनवर वेळीच प्राथमिक उपचार झाले असते तर आज आमचा मुलगा जिवंत असता, अशी खंत राजनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.