Odisha Train Accident : सगळी हास्पिटलं धुंडाळली सापडला नाही, अखेर शवागारात मुलाचा हात हलताना दिसला अन्..

| Updated on: Jun 05, 2023 | 8:26 PM

कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या दिवशी हेलाराम यांनी त्यांचा मुलगा विश्वजीत याला शालीमार स्थानकात गाडीत बसविले होते. त्यानंतर गाडीचा अपघात झाल्याची ती वाईट बातमी धडकली.

Odisha Train Accident : सगळी हास्पिटलं धुंडाळली सापडला नाही, अखेर शवागारात मुलाचा हात हलताना दिसला अन्..
balasore
Image Credit source: socialmedia
Follow us on

बालासोर : ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील रेल्वे अपघातात ( Odisha Train Accident ) दोनशेहून अधिक मृत्यू तर एक हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघातातील एक मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. अपघातानंतर ट्रेनच्या प्रवाशांचे नातलग आपल्या माणसाला शोधत असल्याचे हृदयद्रावक व्हिडीओ पाहून डोळे ओले होत आहेत. हावडाचे एक दुकानदार हेलाराम मलिक आपल्या मुलाला शोधण्यासाठी घरातून तडक निघाले, पण मुलाच्या शोधासाठी त्यांना मन मारून शवागरही पहावे लागले.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या दिवशी हेलाराम यांनी त्यांचा मुलगा विश्वजीत याला शालीमार स्थानकात गाडीत बसविले होते. त्यानंतर गाडीचा अपघात झाल्याची ती वाईट बातमी धडकली. त्यानंतर त्यांनी मुलाला फोन केला तर मुलाची खुशाली कळली पण जखमा भरपूर असल्याने तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता.

मुलगा जीवंत आहे या बातमीने हेलाराम यांनी एका क्षणाचाही विलंब न करता एका स्थानिक एम्ब्युलन्स ड्रायव्हर पलाश पंडीत याला राजी केले. हेलाराम यांनी त्यांचा मेहुणा दीपक दास याला सोबत घेत त्याच रात्री प्रवास सुरु केला. हेलाराम त्याच रात्री 230 किमीचा प्रवास करीत बालासोरला पोहचले. परंतू सर्व हॉस्पिटल्स शोधूनही त्यांचा विश्वजीत काही सापडला नाही.

हिंमत हरली नाही

हेलारामचे मेहुणे दीपक दास यांनी सांगितले की आम्ही हिंमत हरली नाही. आम्ही लोकांकडे चौकशी करीत राहीलो. एका व्यक्तीने सल्ला दिला जर मुलगा हॉस्पिटलमध्ये सापडत नाही तर बहनगा हायस्कूलमध्ये एकदा चौकशी करा. तेथे अपघातातील मृतदेहांना ठेवले आहे. आम्हाला हे स्वीकारणे अवघड होत. आम्ही काळजावर दगड ठेवून तेथे निघाल्याचे दास यांनी सांगितले.

शवागारात उजवा हात हलला

दीपक दास यांनी सांगितले की तेथे अनेक मृतदेहांना ठेवण्यात आले होते. आम्हाला स्वत: जाऊन मृतदेहांची ओळख पटविण्याची परवानगी दिली नाही. परंतू काही वेळाने जेव्हा कोणी तरी एका व्यक्तीचा उजवा हात हलताना दिसला तेव्हा गोंधळ उडाला. आम्ही तेथेच होतो. आम्ही पाहीले की तो आमचा विश्वजीतच होता. बेशुध्द अवस्थेत तो होता. तो खुपच जखमी झाला होता. आम्ही त्याला एम्ब्युलन्सने बालासोरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेथे त्याला काही इंजेक्शन्स दिली गेली. त्याची स्थिती पाहून त्याला कटक येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यास डॉक्टरांनी सांगितले, परंतू बॉंडवर सही करून आम्ही त्याचा डिस्चार्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले. विश्वजीतवर कोलकाता येथील रुग्णालयात सर्जरी केली गेली.आता त्याची प्रकृती स्थिर आहे.