
RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशातील अलिगडमधून जातीय भेदभाव संपवून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संघाच्या ‘स्वयंसेवकांना’ संबोधित करताना भागवत म्हणाले की, हिंदू समाजाने एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी या तत्त्वाचा अवलंब करून सामाजिक एकता मजबूत करावी. संघ प्रमुख पाच दिवसांचा दौऱ्यानंतर सोमवारी नवी दिल्लीत जाणार आहे.
स्वयंसेवकाशी संवाद साधताना मोहन भागवत म्हणाले की, एकतेच्या माध्यमातून भारताची जबाबदारी केवळ सामाजिक पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरही पार पाडता येईल. जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित केल्याशिवाय खरे सामाजिक ऐक्य होऊ शकत नाही. हिंदू समाजाचा पाया संस्कार आहे. समाजास पारंपारिक, सांस्कृतिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारित बनवणे आवश्यक आहे.
मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, संघाच्या स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांना एकमेकांच्या घरी आमंत्रित केले पाहिजे. त्यामुळे तळागाळात एकता आणि सौहार्दाचा संदेश दिला जाईल. कुटुंब हा सामाजिक एकतेचा एक मूलभूत भाग आहे. ते संस्कारच्या मजबूत कौटुंबिक मूल्यांवर आधारलेले आहे. भारत आता थांबणार नाही. भारताचा चौफर विकास होणार आहे.
संघ प्रमुखांना सण-उत्सव एकत्र साजरे करण्याचे आवाहन केले. त्यामुळे राष्ट्रीयता आणि सामाजिक एकता मजबूत होईल, असे त्यांनी म्हटले. संघ प्रमुख मोहन भागवत यांचा दौरा १७ एप्रिल रोजी सुरु झाला. त्यांचा हा पाच दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यात ते संघाच्या प्रचारकांसोबत बैठका घेत आहे. आपल्या दौऱ्यात मोहन भागवत यांनी एच.बी. इंटर कॉलेज आणि पंचन नगरी पार्कमधील शाखांना भेट दिली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला.