
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुण रुग्णाचे प्राण वाचवल्याचे तुम्ही ऐकले असेल, मात्र आता डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा जीव गेल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 2017 मध्ये एका गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र त्यांनतर तिची प्रकृती बिघडली होती. दुसऱ्या दवाखान्यात गेल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला.
दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरने सांगितले की, पहिल्या डॉक्टरे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात एक रक्त सुकवणारे उपकरण सोडले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी ते बाहेर काढले, मात्र यानंतर काही दिवसांनी या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यानंतर ग्राहक मंचाने पहिल्या रुग्णालयाला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित घटना दिलदारनगरमधील कादरी रुग्णालयात घडली होती. संबंधित महिलेवर पहिली शस्त्रक्रिया कादरी रुग्णालयात करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्या महिलेच्या पोटात रक्त सुकवणारे उपकरण सोडले होते. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली, त्यामुळे तिला शम्मे हुसैनी रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी पहिल्या डॉक्टरचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राम आशिष नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीला 27 मार्च 2017 रोजी गंभीर अवस्थेत कादरी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र यानंतर प्रकृती बिघडल्याने तिला शम्मे हुसैनी रुग्णालयात नेण्यात आले. तिची तपासणी केली त्यावेळी तिच्या पोटात एक उपकरण असल्याचे दिसून आहे. सर्जरीनंतर ते बाहेर काढण्यात आले, मात्र काही दिवसांनी त्या महिलेचा मृत्यू झाला.
डॉक्टरवर एफआयआर
राम आशिष यांनी पत्नीच्या मृत्यूला दोषी असणाऱ्या डॉक्टरवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांना तक्रार पत्र लिहिले, त्यानंतर डॉ. मनोज सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. राम आशिष यांनी जिल्हा ग्राहक मंचातही तक्रार केली होती. या महिलेच्या शवविच्छेदन अहवालात शस्त्रक्रियेनंतर पोटात संसर्ग झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णालयाल दोन महिन्यांत महिलेच्या कुटुंबाला 12 लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते.