
ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारतीय जवानांचं आणि भारतीय सैन्य ताकदीचं जगभरातून कौतुक होत आहे. भारताने स्वत:चं कोणतंही नुकसान न करता, पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळांवर आणि पाकिस्तानच्या एअरबेसवर अचूक हल्ला करत पाकला सळो की पळो करून सोडलं. 100 हून अतिरेकी आणि पाकिस्तानी सैन्याशी संबंधित 50 लोक या हल्ल्यात मारले गेले. पाकिस्तानचं लष्करी नुकसान झालं ते वेगळंच. या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भूज एअरबेसवर येऊन भारतीय सैन्याचं तोंडभरून कौतुक केलं. जेवढ्या वेळात लोक नाश्ता करतात, तेवढ्या वेळात तुम्ही पाकिस्तानचं काम तमाम केलं, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याचा गौरव केला.
भुज एअर फोर्स स्टेशनवर येऊन राजनाथ सिंह यांनी हवाई योद्यांचं ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानची चांगलीच खेचली. जेवढ्या वेळात लोक नाश्ता करतात तेवढ्या वेळात तुम्ही शत्रूचं काम तमाम केलं. ऑपरेशन सिंदूरच्या कााळात तुम्ही जे काही केलं, त्याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. मग ते भारतात असो की विदेशात असो. प्रत्येकाला तुम्चा अभिमान आहे. पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त 23 मिनिटं पूरे होते. जेवढ्या वेळात लोक नाश्ता करतात, तेवढाच वेळ तुम्ही घेतला आणि पाकला धडा शिकवला, असं राजनाथ सिंह म्हणाले.
काल मी श्रीनगरमध्ये आपल्या बहाद्दूर सैन्याच्या जवानांशी चर्चा केली. आज मी हवाई योद्ध्यांना भेटत आहे. काल मी उत्तरेकडे जाऊन आपल्या जवानांशी संवाद साधला. आत मी पश्चिमेकडे येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. मी दोन्ही ठिकाणी प्रचंड जोश आणि जल्लोश पाहिला. उत्साह पाहिला. तुम्ही भारतीय सीमा सुरक्षित ठेवाल याची मला खात्री आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी बशीर बद्र यांचा एक शेरही ऐकवून पाकिस्तानला सुनावलं. ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल के चलना क्योंकि तुम नशे में हो,’ अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला सुनावलं.
तुम्ही पाकिस्तानातील टेरर इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रभावी कारवाई केली. पण आता उद्ध्वस्त झालेल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांना पुन्हा बनवण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांकडून घेण्यात आलेल्या टॅक्सचा वापर जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांसाठी करण्यात येत आहे. मसूद अजहर सारख्या खतरनाक अतिरेक्याला सुमारे 14 कोटी रुपये देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने त्याला वैश्विक दहशतवादी घोषित केल्यानंतरही पाकिस्तान ही मदत करत आहे. त्यामुळे पाकिस्तानला दिलेल्या मदतीचा आयएमएफने पुनर्विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.