राजधानी दिल्लीत हालचाली वाढल्या, रात्रीच्या वेळी मोठ्या राजकीय घडामोडी, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Sep 05, 2023 | 9:14 PM

देशात आगामी काळात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण पडद्यामागे तशाच काही घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे देशाची राजधानी दिल्लीत आज हालचाली वाढल्या आहेत.

राजधानी दिल्लीत हालचाली वाढल्या, रात्रीच्या वेळी मोठ्या राजकीय घडामोडी, नेमकं काय घडतंय?
Follow us on

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : राज्यात आणि देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषण सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारवर आरक्षणासाठी दबाव वाढताना दिसतोय. दुसरीकडे प्रत्येक पक्षाच्या गोटात प्रचंड हालचाली घडत आहेत. देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. या सगळ्या घडामोडी समांतर घडत असताना देशाची राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलाय.

देशभरातील विरोधी पक्षांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज रात्री घडामोडींना वेग आलाय. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हजर आहेत. याशिवाय काँग्रेससह डीएमके, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षाचेही नेते बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीत आगामी विशेष अधिवेशनाबाबत रणनीती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या नेमकं मनात काय?

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या पाच दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. विशेष म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी संसदेतं पावसाळी अधिवेशन पार पडलं. असं असताना सरकारने अचानक पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात सरकार एक महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे. एक देश, एक निवडणूक हे विधेयक सरकार या अधिवेशनात मंजूर करुन घेणार आहे. हे विधेयक मंजूर झालं तर देशात येत्या डिसेंबर महिन्यात सर्व निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ कायदा मंजूर झाल्यानंतर देशात अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अध्यादेश समोर आल्यानंतरच याबाबत सविस्तर माहिती समजू शकेल. पण हा कायदा मंजूर झाला तर डिसेंबर महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.