पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर, किती रक्कम मिळणार?
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली असून, जखमींनाही आवश्यक वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी, अतुल मोने या सहा जणांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचे पार्थिव महाराष्ट्रात आणले जाणार आहे. यापैकी ४ पर्यटकांचे पार्थिव मुंबईत तर २ पार्थिव पुण्यात पाठवले जाणार आहेत. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबासाठी मदतही जाहीर केली आहे.
मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
राज्यातील पर्यटकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री आशिष शेलार समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. तर, मंत्री गिरीश महाजन हे स्वतः घटनास्थळी (श्रीनगर) जात आहेत. तसेच राज्यातील पर्यटकांसाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष विमानासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. पहलगाममध्ये असलेले पर्यटक सुखरूप असले तरी ते चिंतेत आहेत. मंत्रालयातील वॉर रूमच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे. जम्मू-कश्मीर प्रशासन या कामात पूर्ण सहकार्य करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेत जे पर्यटक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनाही महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल. जर कुणाला त्याआधी परत यायचे असेल, तर त्याचीही व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
