भारताचा एवढा धसका; पंजाब ते खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान सरकारच्या त्या आदेशामुळे नागरिकांमध्ये खळबळ
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दरम्यान भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानी प्रशासनासोबतच नागरिकांमध्ये देखील आहे. अद्याप भारताने पाकिस्ताविरोधात हल्ल्यासारखी कोणतीही कारवाई केलेली नाहीये, मात्र पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या पंजाब प्रांतापासून ते अफगाणिस्तानाच्या सीमेवर असलेल्या खैबर पख्तूनख्वा राज्यापर्यंत भीतीचं वातवरण आहे. भारताकडून कधीही एअर स्ट्राईक होऊ शकतो अशी भीती पाकिस्तानच्या सरकारला आणि तेथील नागरिकांना वाटत आहे. या हल्ल्यांची रेंज खैबर पख्तूनख्वा राज्यापर्यंत देखील असू शकते असं देखील पाकिस्तानच्या सरकारला वाटत आहे.
याच पार्श्वभूमीवर खैबर पख्तूनख्वाच्या 29 जिल्ह्यांत इलेक्ट्रिक सायरन तैनात करा असा आदेश पाकिस्तानच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच सर्व इलेक्ट्रिक सायरन चेक करा, त्यातील एखादा काम करत नसेल तर त्याला दुरूस्त करा असेही आदेश देण्यात आले आहेत. जर अचानक हल्ला झाला तर अशावेळी सर्वांना अलर्ट करण्यासाठी हे सायरन महत्त्वाचे असल्याचं तेथील स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. खैबर पख्तूनख्वाच्या 29 जिल्ह्यांमध्ये 50 सायरनची व्यवस्था करण्यात आली आहे.
या संदर्भात खैबरच्या नागरी सुरक्षा विभागानं सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींना एक पत्र लिहिलं आहे. युद्धाच्या वेळी सायरनची भूमिका महत्त्वाची असते. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये या सायरनच्या माध्यमातून लोकांना अलर्ट करणे आपल्यासाठी सोपे होईल. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये सायरन तयार ठेवा. असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.एवढंच नाही तर या पत्रामध्ये युक्रेनचं देखील उदाहरण देण्यात आलं आहे, युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात याच पद्धतीची यंत्रणा उभारण्यात आली आहे, त्यामुळे त्यांना रशियाकडून होणाऱ्या हल्ल्याची लगेच कल्पना मिळते असंही या पत्रात म्हटलं आहे.
पाकिस्तानवर दबाव
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्यामुळे याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे.
