
भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च एंड एनालिसिस विंग (रॉ) ला नवीन प्रमुख मिळाला आहे. केंद्र सरकारने पंजाब केडरचे 1989 बॅचचे आपीएस अधिकारी पराग जैन यांना रॉचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केले आहे. दोन वर्ष ते रॉचे प्रमुख असणार आहेत. रॉ चे विद्यामान प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत आहे. त्यांची जागा पराग जैन घेणार आहेत. पराग जैन सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत. त्यांना पाकिस्तान प्रकरणात एक्सपर्ट मानले जाते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्यांच्या जागांचे लोकेशन देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.
पराग जैन यांनी यापूर्वी चंदीगडचे एसएसपी म्हणून काम केले आहे. लुधियानात डीआयजी ते होते. त्यांची जम्मू आणि काश्मीरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या केंद्रशासित प्रदेशात दहशतवादविरोधी रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कॅनडा आणि श्रीलंकेत भारतीय प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे.
पराग जैन हे बऱ्याच काळापासून रॉ मध्ये काम करत आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यानही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दहशतवाद्यांच्या तळांची अचूक माहिती दिली. त्यामुळे हवाई दलाला पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळे नष्ट करता आली. तसेच त्यानंतर पाकिस्तानमधील लष्करी केंद्रांवर हल्ला करता आला. पराग जैन यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि बालाकोट एअरस्ट्राइक यासारख्या महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्येही योगदान दिले आहे. विशेषतः पाकिस्तान डेस्क हाताळण्यात त्यांची खासियत आहे.
1962 च्या भारत-चीन युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर, परदेशी गुप्त माहिती अधिक अचूकपणे गोळा करण्यासाठी वेगळ्या संस्थेची आवश्यकता भासू लागली. ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘रॉ’ ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी करण्यात आली होती. या संस्थेचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काओ होते. विदेशात भारताविरोधात सुरु असलेल्या कारवायांची माहिती काढण्याचे काम रॉ करते. विदेशीतील गुप्त माहिती जमा करणे, राज्यकर्त्यांना विदेशी धोरण ठरवताना मदत करणे, अण्वस्त्र संरक्षणाची जबाबदारी रॉ पाहते. बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सिक्कीमचे एकत्रीकरण यामध्ये या संस्थेचे महत्वाचे योगदान आहे.