नितीश कुमार यांनी हिजाब हटवातच पाकिस्तानचा जळफळाट, थेट या गोष्टीची केली मागणी… प्रतिक्रिया काय?

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी नवनियुक्त आयुष डॉक्टर नुसरत परवीन हिचा हिजाब हटवला होता. यावर आता पाकिस्तानातून प्रतिक्रिया आली आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

नितीश कुमार यांनी हिजाब हटवातच पाकिस्तानचा जळफळाट, थेट या गोष्टीची केली मागणी... प्रतिक्रिया काय?
Nitish Kumar
Image Credit source: X
| Updated on: Dec 16, 2025 | 10:41 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी नवनियुक्त आयुष डॉक्टर नुसरत परवीन हिचा हिजाब हटवला होता. यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. भारतात हे प्रकरण तापलेले आहे. भारतातील आरजेडी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधारी जेडीयूवर आणि नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. अशातच आता पाकिस्तानातही याबाबत चर्चा होताना दिसत आहे. पाकिस्तानने याबाबत काय म्हटले ते जाणून घेऊयात.

पाकिस्तानी वृत्तपत्राने काय म्हटले?

नितीश कुमार यांच्या या कृतीनंतर पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने लिहिले की, ‘नुसरत परवीन स्टेजवर येताच नितीश कुमार यांनी तिला हिजाब काढण्यासाठी इशारा केला. ती काही बोलण्यापूर्वी किंवा बुरखा काढण्याला सहमती देण्यापूर्वीच नितीश कुमार यांनी स्वतः हात पुढे केला आणि तिचा बुरखा स्वतःच काढून टाकला.’ आता भारत आणि पाकिस्तानमधील नेटकरी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पाकिस्तानमधील अनेकांनी अशा कृतीमुळे भारतात मुस्लिमांविरुद्ध अशा घटना सामान्य होतील असं म्हटलं आहे.

पाकिस्तान मानवाधिकार परिषदेने काय म्हटले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कृतीचा पाकिस्तान मानवाधिकार परिषदेने तीव्र निषेध केला असून भारत सरकारकडे याबाबत तात्काळ, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. नितीश कुमार यांची एक क्लिप शेअर करताना पाकिस्तान मानवाधिकार परिषदेने म्हटले की, ‘ही घटना केवळ एका महिलेचा अपमान नाही तर मानवी प्रतिष्ठेवर, धार्मिक स्वातंत्र्यावर, महिलांच्या वैयक्तिक स्वायत्ततेवर आणि मूलभूत मानवी हक्कांवर उघड हल्ला आहे. हा हल्ला कोणत्याही सुसंस्कृत, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष देशात अस्वीकार्य आहे.”

मानवाधिकार आयोगाने नितीश कुमार यांच्या कृतीवर म्हटले की, “संयुक्त राष्ट्र महासभा आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या घटनेची दखल घेतली असून धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्यामुळे भारताकडून उत्तराची मागणी करत आहे. आता भारतीय अधिकाऱ्यांनी पीडितेची वैयक्तिक आणि अधिकृतपणे माफी मागावी. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस कायदेशीर उपाययोजना कराव्यात.”

नेमकं प्रकरण काय आहे?

बिहारच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, नवनियुक्त डॉक्टरांमध्ये 685 आयुर्वेद, 393 होमिओपॅथी आणि 205 युनानी डॉक्टरांचा समावेश आहे. सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 10 डॉक्टरांना स्वतः नियुक्तीपत्रे दिली, तर उर्वरित उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीपत्रे देण्यात आली. नुसरत परवीन जेव्हा नियुक्तीपत्र घेण्यासाठी नितीश कुमार यांच्याजवळ आली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत विचारले की, ‘हे काय आहे?’ त्यांनी लगेच तिच्या चेहऱ्यावरील हिजाब काढला. त्यानंतर नुसरत परवीनला अधिकाऱ्यांनी दूर केले.