पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, पंजाबच्या निवासी भागावर ड्रोनने हल्ला, अनेकजण जखमी

भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या तीव्र तणाव आहे. पाकिस्तानी ड्रोनने पंजाबमधील फिरोजपूर आणि राजौरी येथे हल्ले केले आहेत, ज्यात नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त आहे. "ऑपरेशन सिंदूर" नंतरचा हा तणाव वाढतो आहे. करतारपूर कॉरिडॉर देखील बंद करण्यात आला आहे. सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था आहे.

पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, पंजाबच्या निवासी भागावर ड्रोनने हल्ला, अनेकजण जखमी
Pakistan Drone Attacks
| Updated on: May 09, 2025 | 10:46 PM

सध्या भारत पाकिस्तान सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर सूड उगवण्यासाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनने निवासी भागावर हल्ला केला आहे. यात एक कुटुंब जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या या जखमी कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सातत्याने सीमाभागात हल्ले केले जात आहेत. नुकतंच पंजाबच्या फिरोजपूरमधील खाई या गावात पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा ड्रोन भारताकडून पाडण्यात आला. त्यावेळी ड्रोनला आग लागली. त्यानंतर हा जळत असलेला ड्रोन नागरी भागात पडला. त्यामुळे एका घराला आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या उपचारासाठी त्यांना फिरोजपूरमधील एका जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकांना घरातच राहण्याचे आवाहन

पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक भागात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. याच भागात करतारपूर कॉरिडॉर देखील आहे. पाकिस्तानकडून जम्मू विभागातील राजौरी येथे आणखी एका ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, करतारपूर कॉरिडॉरच्या आसपास अनेक ड्रोन दिसले आहेत. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने हे सर्व ड्रोन हवेतच पाडले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यानंतर पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

करतारपूर साहिब कॉरिडॉर बुधवारपासून बंद

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेला करतारपूर साहिब कॉरिडॉर बुधवारपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांची वर्दळ कमी झाली आहे. सध्या भारताच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भारत सरकारने करतारपूर साहिब दर्शनाची वेबसाइट देखील बंद केली आहे, ज्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी झाली आहे.