पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया देणं IAS अधिकाऱ्याला पडलं महागात, सोशल मीडियावर खळबळ

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर दुसरीकडे एका महिला आयएएस अधिकाऱ्यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्याने सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला आहे.

पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया देणं IAS अधिकाऱ्याला पडलं महागात, सोशल मीडियावर खळबळ
| Updated on: Jul 22, 2024 | 5:18 PM

आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात चर्चेत आल्या आहेत. पूजा खेडकर या वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होत्या. पण त्याआधीच त्यांचं पद धोक्यात आलं आहे. वादात सापडल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण रद्द करण्यात आलं आहे. यूपीएससीने त्यांच्याविरोधात एफआयआर देखील दाखल केली आहे. नाव आणि वयात फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी ज्या कोट्यातून ही नोकरी मिळवली त्यावरुन देखील बरेच वाद सुरु आहेत. दुसरीकडे वडिलांचे उत्पन्न जास्त असून सुद्धा त्यांनी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करुन त्याचा ही फायदा घेतला होता. आता त्यांची आई मनोरमा खेडकर देखील वादात सापडल्या आहेत. शेतकऱ्याचा बंदूकीचा धाक दाखवून धमकावल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसरीकडे तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्याने असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याने नागरी सेवांमध्ये अपंगत्व कोट्याच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल म्हणाल्या की, तळागाळात काम केल्यामुळे दिव्यांगांना आयएएस, आयपीएस सारख्या प्रतिष्ठित सेवांमध्ये काम करताना अडचणी येतात.


दिव्यांगांना नागरी सेवांमध्ये आरक्षणाची गरज काय?

स्मिता सभरवाल पुढे म्हणाल्या, AIS (IAS/IPS/IFoS) चे स्वरूप फील्ड-वर्क, दीर्घ कामाचे तास, लोकांच्या तक्रारी थेट ऐकणे – ज्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. मग या महत्त्वाच्या सेवेत अपंग कोट्याची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

स्मिता सभरवाल यांच्या पोस्टवर लोकांनी मात्र टीका करण्यास सुरुवात केली आहे.अनेकांनी त्यांच्या पोस्टला अनभिज्ञ म्हटले आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘ही अत्यंत दयनीय आणि बहिष्कृत वृत्ती आहे. नोकरशहा त्यांची मर्यादित मते आणि विशेषाधिकार कसे दाखवतात हे पाहणे मनोरंजक आहे.