ब्राझीलमध्ये मोदींचं भव्य स्वागत, ‘ऑपरेशन सिंदूर’ची दिसली खास झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलमधील रिओ डी जानेरो इथं पोहोचले आहेत. तिथल्या भारतीय समुदायाने त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदींनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. तिथल्या भारतीयांच्या उत्साहाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

ब्राझीलमध्ये मोदींचं भव्य स्वागत, ऑपरेशन सिंदूरची दिसली खास झलक
Narendra Modi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 06, 2025 | 12:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझीलमधील रिओ डी जानेरो इथं पोहोचले आहेत. इथं ते 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर ते ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून ब्राझीलियाला राजकीय दौऱ्यासाठी जातील. मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्याचा हा चौथा टप्पा आहे. रिओ डी जानेरो इथं पोहोचताच भारतीय समुदायाने मोदींचं जोरदार स्वागत केलं. पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक सादरीकरणं आणि देशभक्तीपर चित्रांनी मोदींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी लोकांनी हातात तिरंगा घेऊन मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या स्वागतादरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ची विशेष झलक पहायला मिळाली. पाकिस्तानविरोधात भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित हे सादरीकरण होतं. या संपूर्ण कार्यक्रमाला डान्स आणि चित्रांच्या माध्यमातून सादर करण्यात आलं होतं.

रिओ डी जानेरो इथं पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित त्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर केलं. यावेळी मोदी म्हणाले, “ब्राझीलमधील भारतीय समुदायाने रिओ डी जानेरोमध्ये माझं खूप चांगलं स्वागत केलं. इथे राहूनही ते भारतीय संस्कृतीशी किती जोडलेले आहेत आणि भारताच्या विकासाबद्दल ते किती उत्साही आहेत, हे खरंच आश्चर्यकारक आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांच्या ब्राझील दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान ते 6 आणि 7 जुलै रोजी रिओ डी जानेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांचा राजकीय दौरा असेल. जवळपास सहा दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल.

जगातील पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी एक सरकारी अनौपचारिक संघटना स्थापन केली, ज्याला BRICS म्हणतात. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या नावावरून त्याचं नाव देण्यात आलं आहे. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा यात समावेश झाल्यानंतर 2024 मध्ये ब्रिक्सचा पुन्हा एकदा विस्तार झाला. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया आणि युएई यांनाही यामध्ये सदस्य बनवण्यात आलं. यावर्षी इंडोनेशियासुद्धा या संघटनेचा सदस्य बनला.