PM Modi’s Oath Ceremony : मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाचे किती मंत्री?

भाजप, नरेंद्र मोदी आणि NDAसाठी उद्याचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत NDAचे जवळपास 18 जण मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. कोणाला किती मंत्रिपद मिळू शकतात, पाहुयात TV9चा स्पेशल रिपोर्ट...

PM Modis Oath Ceremony : मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाचे किती मंत्री?
| Updated on: Jun 08, 2024 | 10:33 PM

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची हॅटट्रिक आता काही तासांवर आली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींसह जवळपास 18 मंत्री शपथ घेवू शकतात अशी माहिती आहे. भाजपला बहुमत नसल्यानं NDAच्या मित्रपक्षांचं महत्व वाढलंय. त्यामुळं चंद्राबाबूंची टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूला मंत्रिमंडळात चांगलाच वाटा मिळेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमारांच्या जेडीयूला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ज्यात ललन सिंह, रामनाथ ठाकूर, संजय कुमार झा यांची नावं आघाडीवर आहेत.

लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद, हिंदूस्थान आवाम मोर्चाचे जीतन राम मांझी निवडून आलेत त्यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. आंध्र प्रदेशात, चंद्राबाबूंच्या टीडीपीचे NDAत मित्रपक्ष म्हणून सर्वाधिक 16 खासदार आहेत. टीडीपीला 4 कॅबिनेट आणि 2 राज्य मंत्रिपद मिळू शकते. मात्र चंद्राबाबूंची मंत्रिपदासह लोकसभेच्या अध्यक्षपदाचीही मागणी आहे.

महाराष्ट्रातून भाजपचे 4 कॅबिनेट मंत्री होवू शकतात. ज्यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंची नावं चर्चेत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा एक जण मोदींसोबत शपथविधी घेवू शकतो. त्यासाठी , प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंचं नाव चर्चेत आहे. तर अजित पवार गटाकडून एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित झाल्याचं कळतं आहे. श्रीकांत शिंदेंना मंत्रिपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेंनी केली आहे.

NDAच्या मित्रपक्षांकडून तगड्या मंत्रालयाची मागणी सुरु आहे. पण भाजप 4 महत्वाची खाती ज्यात गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र खातं स्वत:कडेच ठेवणार आहे. ही खाती सोडण्यास भाजप तयार नाही.

रेल्वे, रस्ते विकास, कृषी, कायदे मंत्री, उद्योग, कोळसा आणि खाण मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय, माहिती-प्रसारण मंत्रालयावरुन जेडीयू आणि टीडीपी मध्ये रस्सीखेच सुरु आहे. मोदींच्या शपथविधीसाठी, शेजारील देशाच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. ज्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, भुटानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कलम दहल प्रचंड, मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मालदिवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ यांना निमंत्रण दिलं असून हे सर्व दिग्गज मोदींच्या शपथविधीला हजर राहतील.

इंडिया आघाडीनं NDAला जबरदस्त फाईट दिली. ज्यात इंडिया आघाडीही जर तरच्या स्थितीत आली. पण नीतीश कुमार आणि चंद्राबाबूंनी मोदींसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र नीतीश कुमारांच्या जेडीयूचे नेते के सी त्यागींनी मोठा गौप्यस्फोट केला. इंडिया आघाडीकडून नीतीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा त्यागींनी केलाय.

इंडिया आघाडीकडून प्रस्ताव आलेत की नितीश कुमारांनी पंतप्रधान व्हावं. ज्यांनी इंडिया आघाडीचं संयोजकपद देण्यासही विरोध केला होता ते आता पीएम पदाची ऑफर नितीश बाबूंना देत आहेत. अखिलेश यादव, केजरीवाल, ममता बॅनर्जी काँग्रेससोबत एका मंचावर येण्यास तयार नव्हते. पण नीतीश कुमारांमुळं इंडिया आघाडी झाली. जी वागणूक जेडीयूला देण्यात आली. त्यामुळं आम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडलो. आता नितीश कुमारांनी एनडीएसोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असले तरी चंद्राबाबू आणि नितीश कुमारांची भूमिका महत्वाची असेल. आतापर्यंत भाजपकडे स्वत:च ताकदीचं बहुमत होतं. आता मॅजिक आकडा नीतीश आणि चंद्राबाबूंमुळं पूर्ण होतंय.