
आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलचे सुनावले. लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना थेट संदेश दिला. त्याचवेळी देशातील नक्षलवाद लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सूतोवाच केले. आता शंभर नाही तर 20 जिल्हेच नक्षलवादाने प्रभावित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी टॅरिफच्या मुद्यावर ते काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मुद्यावर मोदींनी असे उत्तर दिले. ते काय म्हणाले?
मोदी भिंतीसारखा उभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज देशाला संबोधित केले. त्यांनी या भाषणा दरम्यान टॅरिफच्या मुद्यावरून अमेरिकेला थेट संदेश दिला. शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतात. त्यांनी भारताला अनेक उत्पादनांचा अव्वल उत्पादक बनवले आहे. भारत शेतकऱ्यांच्या हिताशी अजिबात तडजोड करणार नाही, कोणतेही हानिकारक धोरण स्वीकारणार नाही,असे मोदींनी स्पष्ट केले.
कोणत्याही प्रतिकूल धोरणापासून शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मोदी भिंतीसारखा उभा आहे, असे पंतप्रधानांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाविषयी सूतोवाच केले. पण मोदींनी संपूर्ण भाषणात हा मुद्दा ओझरताच घेतला. त्यांनी भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेल्या शुल्काबाबत थेट भाष्य करणे टाळले. त्यांनी टॅरिफ, ट्रम्प अथवा अमेरिका यावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे टॅरिफ मुद्यावर अमेरिकेचा दबाव कायम आहे का, असा सवाल विचारल्या जात आहे. पंतप्रधान या मुद्यावर थेट बोलत नसल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
वाद नको विकासाचे धोरण
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे उदाहरण दिले. ते म्हणाले की एखाद्याची रेषा कमी करण्यात आपण ऊर्जा का कमी करावी. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, एखाद्याची रेषा कमी करण्यात, त्याची रेषा पुसण्यात आपण ऊर्जा का खर्च करावी. आपण संपूर्ण ऊर्जेसह आपली रेषा मोठी करू. जर आपण आपली रेषा वाढवली, मोठी केली तर जगाला आपली ताकद कळेल, असा थेट संदेश त्यांनी अमेरिकेला दिला. त्यामुळे या मुद्यावर भारत अमेरिकेशी वाद न घालता आपला मार्ग निवडेल असे त्यांनी स्पष्ट केले.