
79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विक्रम नावे केला. त्यांनी 12 व्यांदा सलग स्वातंत्र्य दिनी देशाशी संवाद साधला. त्यांनी लाल किल्ल्यावरून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यंदा डब्बल दिवाळी साजरी होणार असल्याचे ते म्हणाले. कर कपातीचे गिफ्ट मोदी या दिवाळीत देण्याची शक्यता आहे. भारत आता विकासाचे पाऊल नाही तर विकासाची मोठी झेप घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2047 पर्यंत विकसित राष्ट्राचे स्वप्न
भारतात पहिली सेमीकंडक्टर चिप तयार करण्यापासून ते आता जेट इंजिन तयार करण्यापर्यंत 10 पट अणुऊर्जा विस्तार करणे, 1 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या युवकांच्या रोजगारापर्यंत त्यांनी अनेक घोषणा केल्या. अनेक योजनांची माहिती दिली. भारत कोणाची रेषा कमी करणार नाही तर आपली विकासाची रेषा वाढवणार असल्याचे ते म्हणाले. भारत स्वतःचे नशीब स्वतः लिहिल असे त्यांनी स्पष्ट केले. 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र होण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा संकल्प त्यांनी सोडला.
या योजनांची केली घोषणा
मेड इन इंडिया चिप लवकरच
जगभरात इतर राष्ट्रे समृद्ध होत गेली. पण भारताची स्वप्नं 50-60 वर्षांपूर्वीच जन्माच्यावेळीच संपवण्यात आली, याची आठवण करुन देत मोदींनी भारत आता मिशन मोडवर असल्याचे म्हटले. यावर्षाच्या अखेरीस, भारताची पहिली मेड इन इंडिया चिप बाजारात येईल असे स्पष्ट केले.
अणुऊर्जा होणार दहापट
2047 पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता 10 पट वाढणार असल्याचा संकल्प त्यांनी सोडला. पुढील दोन दशकांत अणुऊर्जा निर्मिती क्षमता दहापट वाढवण्याच्या भारताच्या मोहिमेचा त्यांनी उल्लेख केला. हे मिशन गाठण्यासाठी, भारत 10 नवीन अणुभट्ट्यांवर काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांची दिवाळी होणार गोड
नागरिकांची यंदाची दिवाळी गोड होणार असल्याचे ते म्हणाले. दिवाळीत जीएसटी सुधारणांचे गिफ्ट नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे जीवनाश्यक वस्तूंवरील कर कपात होईल आणि महागाई कमी होईल. त्याचा फायदा लघू आणि मध्यम उद्योजकांसह, स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना होईल असे मोदी म्हणाले.
भारत रोजगार योजना
लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधानांनी तरुणांसाठी मोठी योजना जाहीर केली. मोदींनी 1 लाख कोटी रुपयांची रोजगार योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत नवीन रोजगार प्राप्त तरुणांना दरमहा 15,000 रुपये देण्यात येईल. या योजनेचा 3 कोटी तरुणांना लाभ होईल. या योजनेमुळे स्वतंत्र भारत ते समृद्ध भारत असा मजबूत पूल तयार होईल.
काय आहे समुद्र मंथन?
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयातीसाठी भारताची मोठी रक्कम खर्ची पडते याकडे त्यांनी लक्ष वेधले. सौरऊर्जा,हायड्रोजन,जल आणि अणुऊर्जेच्या माध्यमातून आता भारत आत्मनिर्भर होईल हे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या महासागरात शोध मोहीम राबवून ही खनिजं शोधण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा थेट संदेश आहे. त्यांनी पाकिस्तानच्या किनारपट्टीवर पेट्रोकेमिकल्स शोधण्यासाठी मदत करणार असल्याचे म्हटले होते.