
PM Modi on Operation Sindoor : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. भारताने पाकसमर्थित दहशतवादाविरोधात सध्या कठोर भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या शस्त्रसंधी झालेली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील घटनांवर लाईव्ह येत देशाला संबोधित केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आपल्या या संबोधनात पाकिस्तानलाही चांगलंच ठणकावलं आहे. दहशतवाद आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही. पाणी तसेच रक्तपात एकत्र वाहू शकत नाहीत, असं मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) संपूर्ण देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानसोबतचा व्यापार, पाकिस्तानसोबतची चर्चा तसेच सिंदू जलवाटप करारावर थेट भाष्य केलं. “पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानी सरकार दहशतवादाला खतपणी घालत आहे. यामुळे पाकिस्तान स्वत:च नष्ट होईल. पाकिस्तानाला वाचायचं असेल तर अगोदर त्यांना दहशतवादाला नष्ट करावंच लागेल. याशिवाय शांतीचा अन्य कोणताही मार्ग नाही. भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. टेटर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही. ट्रेटर आणि ट्रेड एकत्र होऊ शकत नाही. सोबतच पाणी तसेच रक्त एकत्र वाहू शकत नाही,” असं थेट भाष्य मोदी यांनी केलं आहे.
म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट असे तीन संदेश दिले आहेत. पाकिस्तानला भारताशी व्यापार करायचा असेल तर अगोदर दहशतवाद संपवावा लागेल. तसेच पाकिस्तानला भारतासोबतच चर्चा करायची असेल तर अगोदर दहशतवादाला नष्ट करावे लागेल, असं मोदी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. सोबतच त्यांनी अप्रत्यक्षणे सिंधू जलवाटप करारावरही भाष्य केलं आहे. दहशतवादी कारवाया चालू असतील तर सिंधू नदीचे पाणीदेखील पाकिस्तानला मिळणार नाही, असे मोदी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
दरम्यान, मोदी यांच्या या थेट इशाऱ्यानंतर आता पाकिस्तान नेमकी काय भूमिका काय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.