राजकारणात मोठा भूकंप, भाजपने माजी मुख्यमंत्र्यांचं घर फोडलं, भाऊ कमळ हाती घेणार
पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पंजाबमध्ये भाजपने माजी मुख्यमंत्र्यांचं घर फोडलं. त्यांचा भाऊ कमळ हाती घेणार आहे.

पंजाबमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपने पंजाबचे माजी मुख्यमंत्री, शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांचं घर फोडलं. त्यांचे चुलत भाऊ निवृत्त मेजर भूपिंदर सिंग ढिल्लन हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते ‘मेजर भूप’ नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजप सरकारच्या काळात प्रकाश सिंग बादल यांचे राजकीय सचिव म्हणून काम पाहिलं आहे. ते माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मानले जातात. त्यांना 2012 साली राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला होता.
ढिल्लन हे दिवंगत माजी खासदार गुरराज सिंग बादल यांचे पूत्र आहेत. गुरराज हे प्रकाश सिंग बादल यांचे वडील रघुराज सिंग यांचे धाकटे भाऊ होते. दोघांचे घर आजूबाजूला आहे. ढिल्लन यांच्या निर्णयाने आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ढिल्लन यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांनी ढिल्लन यांच्या राहत्या घरी भेट दिली होती. त्यांची काही दिवसांपूर्वी पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाली. खरंतर मनप्रीत सिंग बादल यांनी तीन वेळा भेट घेतली होती. परंतु सुखबीर सिंग बादल यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने भेट दिली नव्हती. परंतु काही दिवसांनी स्वत: सुखबीर हे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, भूपिंदर सिंग ढिल्लन हे त्यांचे पूत्र अमरवीर सिंह बावा यांच्यासोबत नायब सिंग सैनी आणि मनप्रीत सिंग बादल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
लांबी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता
लांबी विधानसभा मतदारसंघातून भाजपने 2022 साली विधानसभा निवडणुकीत राकेश ढिंगरा यांना मैदानात उतरवलं होतं. तर शिरोमणी अकाली दलाकडून प्रकाश सिंग बादल, आम आदमी पक्षाकडून गुरमीत सिंग खुड्डिया, काँग्रेसकडून जगपाल सिंह अबुलखुराना यांनी निवडणूक लढवली होती. खुड्डिया यांना 66,313 मते मिळाली होती. तर बादल यांना 54,917 मते मिळाली होती.