Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा, प्रणिती शिंदेंची टीका, चित्रा वाघ भडकल्या!

प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना सरकारला चांगलंच घेरलं. त्यांनी सरकावर टीकेचे आसूड ओढले.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा, प्रणिती शिंदेंची टीका, चित्रा वाघ भडकल्या!
praniti shinde
| Updated on: Jul 29, 2025 | 6:17 PM

Praniti Shinde On Operation Sindoor : सध्या संसदेत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामवर झालेला दहशतवादी हल्ला यावर जोरदार चर्चा चालू आहे. पहलगाम हल्ल्यादरम्यान सरकारने घेतलेले निर्णय, सरकारचे धोरण यावर विरोधकांकडून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंद यांनी तर ऑपरेशन सिंदूर हे मीडियासाठी राबवण्यात आलेला एक तमाशा होता, अशी सडकून टीका केली आहे. या टीकेनंतर आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही प्रणिती शिंदे यांना लक्ष्य केलंय.

प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

प्रणिती शिंदे आज संसदेत पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर याविषयी संसदेत आपले मत माडंत होत्या. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यावर टीकेचे आसूड ओढले. पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयाकडे पाहून वेदना होतात. सरकारने आतापर्यंत पहलगामवर हल्ला करणाऱ्यांना पकडलेले नाही. सरकारला अजूनही काही सुगावा लागलेला नाही. त्याबद्दल मी रोष व्यक्त करते. ऑपरेशन सिंदूर हे देशभक्तीसंदर्भातील नाव वाटते. पण खरं म्हणजे सरकारने मीडियावर केलेला हा एक तमाशा होता, अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच ऑपरेशन सिंदूरमधून नेमकं काय मिळालं? हे अजूनही कोणीच सांगत नाहीये, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

चित्रा वाघ यांचा जोरदार हल्लाबोल

तर प्रणिती शिंदे यांच्या या विधानावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणताना प्रणिती शिंदे यांना लाज वाटली नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच ज्यांच्या बळावर तुम्ही-आम्ही सगळे सुरक्षित आहोत, त्यांच्याबाबत अशी उपेक्षेची भाषा केली जात आहे, असे म्हणत नको तिथे तुष्टीकरणाचं राजकारण करू नका, असा सल्लाही चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदे यांना दिला. हा फक्त भारतीय सैन्याचाच अपमान नाही, तर प्रत्येक देशभक्त आणि नागरिकाच्या अस्मितेवर घाव आहे. सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही, हे प्रणिती शिंदे यांनी लक्षात ठेवावे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.