
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा धुव्वा उडला आहे. सलग दोन वेळा विक्रमी बहुमत मिळवणाऱ्या “आप” या निवडणुकीत 70 पैकी केवळ 22 जागा मिळाल्या. या निवडणुकीत केवळ “आप”चा पराभव झाला नाही तर पक्षातील सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासारख्या बड्या नेत्यांचाही पराभव झाला. “आप” च्या या परिस्थितीवर भाजपसोबत काँग्रेसही त्यांच्यावर टीका करत आहे. दुसरीकडे पक्षातूनही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आवाज उठत आहे. “आप”चे संस्थापक सदस्य राहिलेल्या प्रशांत भूषण यांनी तर पक्षाचा झालेल्या या पराभवाचे वर्णन पक्षाच्या अंताची सुरुवात असे केले आहे. तसेच कुमार विश्वास यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात वकील राहिलेले प्रशांत भूषण यांची “आप” च्या स्थापनेत महत्वाची भूमिका राहिली आहे. परंतु काही मतभेदांमुळे ते पक्षातून बाहेर पडले. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना घेरले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील “आप” च्या पराभवास अरविंद केजरीवाल जबाबदार आहे.
प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या स्थापनेच्या वेळी समोर ठेवलेली उद्दिष्टांचा उल्लेख करत म्हटले की, एक पक्ष पर्याय म्हणून समोर आला होता. त्या पक्षात पारदर्शकता, उत्तरदायीत्व आणि लोकशाही असण्याची अपेक्षा होती. परंतु हा पक्ष अरविंद केजरीवाल यांचा नेतृत्वात अपारदर्शक आणि भ्रष्ट पक्ष झाला. या पक्षाने लोकपालसुद्धा होऊ दिला नाही.
प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल आणि लग्झरी कारांमध्ये फिरण्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मर्जीने 45 कोटी रुपयांचा शीशमहल बनवला. तसेच त्यांना प्रवासासाठी लग्झरी गाड्या लागू लागल्या. त्यांनी आम आदमी पक्षाच्या एक्सपर्ट कमिटीची रिपोर्टसुद्ध कचऱ्याच्या पेटीत टाकून दिली. त्यांनी खोटेपणा आणि प्रोपेगेंडाचे राजकारण केले, असा जोरदार हल्ला प्रशांत भूषण यांनी केला.