
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये असलेल्या आदमपूर एअर बेसला भेट दिली. तिथे त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारत ही बुद्धांची भूमी आहे, तसेच ती गुरु गोविंद सिंह यांची देखील भूमी आहे, भारताकडे डोळे वटारुन बघितलं तर खात्माच होणार, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली, मी देशाच्या सशस्त्र दलाला सलाम करतो, तुम्ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनला आहात असं मोदी यांनी यावेळी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?
विरांच्या धरतीवरून नेव्ही, आर्म फोर्स आणि हवाई दलाच्या सर्व जवानांना सॅल्यूट करतो. नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा बनला आहात. तुमच्या पराक्रमामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमत आहे. या ऑपरेश दरम्यान प्रत्येक भारतीय तुमच्या सोबत होता. प्रत्येक भारतीयांची प्रार्थना तुमच्या सोबत होती. आज प्रत्येक नागरिक आपल्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञ आहे, त्यांचा ऋणी आहे. ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य मोहीम नाहीये. ही भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारत ही बुद्धांची भूमी आहे, तसेच ती गुरु गोविंद सिंह यांची देखील भूमी आहे, भारताकडे डोळे वटारुन बघात तर खात्माच होईल असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अधर्माचा नाश, धर्माच्या स्थापनेसाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या मुली, बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा अतिरेक्यांचा फणा आपण त्यांच्या घरात घुसून ठेचला. ते भेदरटपणे लपले होते. पण त्यांनी ज्यांना आव्हान दिलं ती हिंदची सेना आहे हे ते विसरले होते. आपण दहशतवाद्यांचे पंख छाटले आहेत, दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.