पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात ‘या’ व्यक्तीचे नाव होतंय सर्वाधिक सर्च, कारण…
पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील संतापाच्या लाटेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानी नागरिक गुगलवर २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड लेफ्टनंट जनरल दीपक हुड्डा यांचे नाव मोठ्या प्रमाणात शोधत आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी करण्यात येत आहे. पाकिस्तानने लष्करासह रणगाडे सुद्धा नियंत्रण रेषेवर तैनात केले आहे. भारत केव्हाही हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानी लष्कराला वाटत आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार नव्हे तर पाकिस्तानातील नागरिकही धास्तावले आहेत. सध्या पाकिस्तानातील अनेक नागरिक गुगलवर 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड निवृत्त लेफ्टनंट जनरल दीपक हुड्डा यांचे नाव सर्च करत आहेत. पाकिस्तानातील हजारो नागरिक दर तासाला त्यांचे नाव सर्च करुन त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानतंर स्पष्टपणे सांगितले आहे. दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना असे जोरदार प्रत्युत्तर मिळेल, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. यामुळे पाकिस्तानला भीती वाटत आहे की भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईकसारखे पाऊल उचलू शकतो. त्यामुळेच जनरल दीपक हुड्डा यांचे नाव गुगलवर सातत्याने शोधले जात आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की २०१६ ला ८ वर्षांपूर्वी जनरल दीपक हुड्डा यांनी जे केले होते, त्याची दहशत आजही पाकड्यांच्या मनात कायम आहे.
पाकिस्तानी लोक काय शोधत आहेत?
सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियावर #DeepakHooda आणि #SurgicalStrike हे ट्रेंड करत आहेत. दीपक हुड्डा यांना पाकिस्तानी लोक नंबर 1 चा शत्रू म्हणत आहेत. पाकिस्तानातील अनेक सोशल मिडिया युजर्सला दीपक हुड्डा यांची सर्जिकल स्ट्राईकवेळी रणनीती काय होती आणि भारत पुन्हा असे पाऊल उचलू शकतो का, याबद्दल जाणून घ्यायचे आहे. हुड्डा यांनी 2016 मध्ये आम्हाला धडा शिकवला, आता पुन्हा तेच होईल का? अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर एकाने म्हटलं की, हुड्डा पुन्हा चर्चेत, भारत सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत आहे? तर एकाने हुड्डा यांचे नाव ऐकूनच पाकिस्तान घाबरतो, सर्जिकल स्ट्राईकचा हिरो! अशी कमेंट केली आहे.
सर्चमध्ये 300 टक्के वाढ
गुगल ट्रेंड्सनुसार, 22 एप्रिलनंतर ‘Deepak Hooda Surgical Strike’ आणि ‘General Hooda India’ या दोन किवर्डच्या सर्चमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इस्लामाबाद आणि कराचीमधील लोक सर्वाधिक हे किवर्ड्स सर्च करत आहेत. पहलगाम हल्ल्याप्रकरणी दीपक हुड्डा यांनी कठोर प्रतिक्रिया दिली होती. ला दिलेल्या एका मुलाखतीत हुड्डा म्हणाले होते की, पहलगाम हल्ला एक सुनियोजित षड्यंत्र आहे. यात पाकिस्तान पूर्णपणे सामील आहे. हल्ल्याची जागा, वेळ आणि पद्धत यावरून हे स्पष्टपणे जाणवते की हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे, असे दीपक हुड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
