
भारत आणि रशियातील मैत्री आणखी घट्ट होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 4-5 डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतीन यांचे स्वागत करणार आहेत. पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण, ऊर्जा आणि व्यापाराला नवी चालना मिळणार आहे. यात एक महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जगाची झोप उडेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुतीन यांच्या भारत दौऱ्याबाबत बोलताना रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, ‘रशिया-भारत संबंध हे केवळ राजनैतिक नियमांचा किंवा व्यापार करारांसाठी नाहीत, तर आमचे द्विपक्षीय संबंध परस्पर समजूतदारपणा, भागीदारी आणि जागतिक बाबींवर आधारित आहेत. हे संबंध आंतरराष्ट्रीय कायदा आणि परस्पर हितसंबंधांच्या आदरावर आधारित आहे. भारताच्या ऐतिहासिक विकासात खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारताकडून मिळणाऱ्या मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे आम्ही मनापासून आभारी आहोत.
दिमित्री पेस्कोव्ह यांनी पुतीन यांच्या या दौऱ्यात Su-57 च्या खरेदी विक्रीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे. Su-57 हे रशियाचे सर्वात प्रगत स्टेल्थ लढाऊ विमान आहे, जे अदृश्यपणे हल्ला करु शकते. भारत आधीच रशियन Su-30 विमानांचा वापर करतो. आता Su-57 खरेदीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि S-500 क्षेपणास्त्र प्रणालीबाबत नवीन करारांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारत-रशिया याच्यातील मैत्री 70 वर्षे जुनी आहे. दोन्ही देशांमध्ये सोव्हिएत काळापासून संरक्षण करार होत आहेत. पुतीन यांनी 2000, 2004, 2010, 2014 आणि 2021 मध्ये भारताला भेट दिली होती. आता होणारी भेट युक्रेनियन युद्धानंतरची पहिली भेट असणार आहे. अमेरिकेच्या दबावाला न घाबरता भारताने रशियन तेल खरेदी केले होते. यामुळे रशियाला मोठा फायदा झाला होता. आता पुतीन यांच्या या दौऱ्यात Su-57 बाबत करार झाल्यास भारताची ताकद वाढणार आहे.