काँग्रेससाठी सर्वात धक्कादायक बातमी…आर्थिक स्त्रोत आटला, देणगीत मोठा फटका, आता केवळ…
Congress Donation Massive Drop: केंद्रीय निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, एफिन्स्टन फाईल, ई20 पेट्रोलपासून अनेक विषयांवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस खऱ्या अर्थाने विरोधकाच्या भूमिकेत आली आहे. पण त्याचवेळी पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली.

Congress Donation Massive Drop: काँग्रेस, राहुल गांधी हे सरकारपासून निवडणूक आयोगाला धक्क्यामागून धक्के देत आहेत. काँग्रेस झाडून कामाला लागली आहे. रस्त्यावर उतरलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, एफिन्स्टन फाईल, ई20 पेट्रोलपासून अनेक विषयांवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस खऱ्या अर्थाने विरोधकाच्या भूमिकेत आली आहे. पण त्याचवेळी पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. काँग्रेसच्या देणगीत मोठी घसरण झाली आहे. काँग्रेसच्या देणगीत तब्बल 75 टक्क्यांची घसरण आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाचा निधी आणि स्त्रोत आटला आहे, हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसची आर्थिक कोंडी?
केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयीची आर्थिक आकडेवारी सादर केली. त्यानुसार, मागील आर्थिक वर्षात, २०२४-२५ या कालावधीत काँग्रेस पक्षाला ५१७.४ कोटी रुपयांची एकूण देणगी मिळाली होती. तर २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात या देणगीत मोठी घसरण झाली. हा आकडा १३०.७ कोटींपर्यंत घसरला. काँग्रेस पक्षाने याविषयाची अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. प्रुडेंट इलेक्ट्रोल ट्रस्टने काँग्रेस पक्षाला गेल्या काही वर्षात सर्वाधिक देणगी दिल्याचे समोर आले आहे. २०२४-२५ मध्ये या ट्रस्टने पक्षाला ४१.८ टक्के योगदान दिले होते.
गेल्या वर्षी काँग्रेसला मिळणाऱ्या देणगीत कॉर्पोरेट जगताचा मोठा वाटा होता. केवळ प्रुडेंट इलेक्ट्रोल ट्रस्टने वाटा उचलला होता. या ट्रस्टने २०२५-२६ मध्ये पक्षाला २५ कोटी रुपये दिले होते. तर २०२४-२५ मध्ये काँग्रेसला या ट्रस्टने २१६ कोटी रुपयांचा फंड दिला होता. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला मोठी देणगी मिळाली होती. पण त्या तुलनेत २०२५-२६ मध्ये मिळालेला १३०.७ कोटींचा निधी आणि २०२३-२४ मध्ये मिळालेल्या देणगीच्या तुलनेत ही रक्कम जवळपास ५३ टक्के कमी आहे.
आर्थिक स्त्रोत घटला, मोजक्या देणगीदारांवर काँग्रेसची मदार
काँग्रेसला मिळालेल्या एकूण निधीपैकी प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट या एकमेव संस्थेने काँग्रेसला २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. एकूण देणगीत या संस्थेचा वाटा जवळपास १९ टक्के इतका आहे. याशिवाय, स्टार सीमेंट, काही विशिष्ट कंपन्या आणि मोजक्याच व्यक्तींकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा निधी मिळाला आहे. मोठ्या कॉर्पोरेट देणगीदारांनी आणि कंपन्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अगदी बोटावर मोजण्या इतक्याच देणगीदारांवर काँग्रेसची मदार उरलेली आहे. आक्रमक आंदोलन करणाऱ्या आणि रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसकडे मोठ्या देणगीदारांना पाठ का फिरवली हा मोठा प्रश्न आहे. त्यामागे कुणाचा दबाव आहे का? ही चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.