पुढील वर्षभरात मोदी सरकार पडेल अन् त्याला कारणीभूत..; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पदत्याग अटळ आहे आणि त्यासाठी देशातील जनतेचा वाढता असंतोष कारणीभूत असेल, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत केलं.

पुढील वर्षभरात मोदी सरकार पडेल अन् त्याला कारणीभूत..; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
Narendra Modi and Rahul Gandhi
Image Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2026 | 9:12 AM

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत मोठं राजकीय विधान केलं आहे. पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पदत्याग निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाची आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष हे यासाठी कारणीभूत असतील, असं राहुल गांधी म्हणाले. बदलती परिस्थिती आणि जनतेचा वाढता असंतोष हे भारतीय राजकारणावर परिणाम करतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लीम’ऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याचा आग्रह धरला. तेव्हा राहुल गांधींनी याला विरोध केला आणि म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. अन्यायाला सामोरं जाणाऱ्या कोणत्याही समजाला उघडपणे आपण पाठिंबा दिला पाहिजे. हिंदू, दलित, उच्चवर्णी, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध-जैन असोत.. काँग्रेसने सर्वांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवला पाहिजे, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

काँग्रेस नेते इम्रान मसूद या सभेत म्हणाले, “मुस्लीम समाज फक्त भाजपला पराभूत करण्यासाठीच मतदान करतो, हा समज पक्षाने बदलला पाहिजे. काँग्रेस पक्षाने मुस्लीम समाजासाठी भरीव काम केलं आहे, असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि याच आधारावर पाठिंबा मागितला पाहिजे. जेणेकरून भाजपला बहुसंख्याक ध्रुवीकरणाचं राजकारण करता येणार नाही.” या बैठकीत काही नेत्यांनी राहुल गांधींकडे तक्रार केली की ते अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर उघडपणे बोलतात, पण पक्षातील इतर ज्येष्ठ नेते त्यावर बोलणं टाळतात. इतर नेत्यांनीही राहुल गांधींप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर बोलावं, असं त्यांनी सुचवलं. जवळपास दोन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली होती. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं.

काँग्रेस अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या या बैठकीला मुस्लीम समाजाव्यतिरिक्त शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन समाजाच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. देशातील सर्व प्रमुख अल्पसंख्याक समाजांना प्रतिनिधीत्व मिळावं, हा त्यामागील उद्देश होता. या बैठकीला शीख समाजाचे गुरदीप सप्पल, ख्रिश्चन समाजाच्या हिबी, बौद्ध समाजाचे राजेंद्र पाल गौतम आणि जैन समाजाचे अभिषेक मनु सिंघवी उपस्थित होते.

Follow Us