
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. एकट्या हरियाणामध्ये 25 लाख बोगस मतदान असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भाजपच्या वतीनं देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. भाजप नेते आणि मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्यचां रिजिजू यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांचा हॉयड्रोजन बॉम्ब कधीच फुटत नाही असा टोला देखील यावेळी रिजजू यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत आहेत, राहुल गांधी हे Gen-Z ला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
गेल्यावेळेस एका महिलेचं नाव आपल्या टी शर्टवर छापून ते फिरत होते, त्यानंतर या महिलेनं त्यांना चांगलंच फटकारलं होतं. बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता थोड्याच दिवसांमध्ये मतदान होणार आहे, तेव्हा हे आता तुम्हाला हरियाणाची कथा ऐकवत आहेत, कारण आता बिहारमध्ये यांच्यासाठी फार काही उरलं नाही, खोटे अरोप करून ते तुमचं लक्ष विचलित करत आहेत, अशी टीका देखील यावेळी रिजजू यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी हे आज एका परदेशी महिलेचं नाव घेत होते, ते सारखं परदेशामध्ये जात असतात आणि तिथून त्यांना जी प्रेरणा मिळते, ते तुम्हाला सांगत असतात. मात्र त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाहीये, ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. असा घनाघात यावेळी रिजजू यांनी राहुल गांधींवर केला आहे. राहुल गांधी नेहमी म्हणतात बॉम्ब फुटणार आहे, मात्र त्यांचा बॉम्ब कधीच फुटत नाही. काँग्रेसचे अनेक नेते मला म्हणतात की जोपर्यंत राहुल गांधी आमचे नेते आहेत, तोपर्यंत आम्ही निवडणूक कधीच जिंकू शकत नाहीत, असा टोलाही यावेळी रिजजू यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.