राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाबाबत खलबतं सुरु झाली आहे. या तिन्ही राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर केला नव्हता. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
BJP
| Updated on: Dec 06, 2023 | 4:31 PM

CM post selection : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने दणदणीत विजया मिळवला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत बैठका सुरु झाल्या आहेत. तिन्ही राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधी जाहीर केला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार आहेत. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच या निवडणुका लढवल्या होत्या. आता विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्षाकडून बैठका घेतल्या जात आहे. जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भाजप राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देणार आहे. या राज्यांतील भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय नेतृत्वापर्यंत आपले विचार पोहोचवत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आपला दावा करत आहेत.

राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह, या तिन्ही नेत्यांनी किमान दोनदा आपापल्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. यावेळीही त्यांची नजर मुख्यमंत्रिपदावर खिळली आहे, पण भाजप हायकमांडच्या मनात काय आहे, हे कोणालाच माहित नाही.

मुख्यमंत्रीपदासाठी या नेत्यांची नावे चर्चेत

राजस्थानमध्ये अलवरचे खासदार बालकनाथ योगी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, खासदार दिया कुमारी यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आली आहेत. मध्य प्रदेशातही सर्वांच्या नजरा शिवराज सिंह चौहान यांच्याकडे लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रमण सिंह यांनी अनेकवेळा सांगितले आहे की, त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल.

विधानसभा निवडणुकीत विजयी भाजपच्या 10 खासदारांचा राजीनामा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमदार झालेल्या भाजपच्या दहा खासदारांनी संसदेचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १२ खासदार विजयी झाले आहेत. राजीनामा देणाऱ्या 10 खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल यांच्यासह नऊ लोकसभा खासदार आणि एका राज्यसभेच्या खासदारांचा समावेश आहे.

पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रेणुका सिंह आणि महंत बालकनाथ हे देखील लोकसभेचा राजीनामा देणार आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या प्रक्रियेचा हा एक भाग आहे.