Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं किती नुकसान? पाकिस्तानला कसं पाणी पाजलं; पहिल्यांदाच खरी माहिती समोर!
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी पाकिस्तानने भारतावर कशाने हल्ला केली याबाबतही सांगितलं आहे.

Rajnath Singh On Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर थेट एअर स्ट्राईक केले होते. आता याच ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारने संसदेत सविस्तर माहिती दिली आहे. भारताने राबललेल्या या ऑपरेशनमध्ये भारताचे किती नुकसान झाले? पाकिस्तानवर कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली? असं सगळं काही सरकारने सांगितलं आहे.
100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले
केंद्रीय संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी आज (28 जुलै) संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेचा उद्देश काय होता? भारतीय सैन्याने कशा पद्धतीने कारवाई केली? या संपूर्ण मोहिमेत सरकारची भूमिका काय होती? अशा सर्वच प्रश्नांची राजनाथ सिंह यांनी उत्तरं दिली आहेत. भारतीय सैन्याच्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी नेमके काय सांगितले?
भारतीय सैन्याने हे ऑपरेशन फक्त 22 मिनिटांत संपवलं. हे ऑपरेशन झाल्यानंतर भारताने पाकच्या डीजीएमओशी संपर्क साधून माहिती दिली. 6 ते 7 मे 2025 दरम्यान भारतीय सैन्याने ही कारवाई केली होती. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या संसदेतील भाषणात सांगितले.
पाकिस्तानने नेमका कसा हल्ला केला?
भारतीय सैन्याने केलेली ही कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणाचा हेतू ठेवून केलेली होती. या कारवाईमध्ये कोणालाही भडकवण्याचा हेतू नव्हता. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ला केला. पाकिस्तानचे हे हल्ले 7 मे ते 10 मे 2025 पर्यंत रात्री दीड वाजेपर्यंत चालू होते. या काळात पाकिस्तानने भारतावर मिसाइल्स, ड्रोन, रॉकेट्स, लाँग रेन्ज शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानच्या निशाण्यावर भारतीय वायुसेनेचे तळ, हवाई तळ, मिलिटरी टेंट होते.
भारताचे कोणतेही मोठे नुकसान नाही
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिम, काऊंटर ड्रोन सिस्टिम, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारताने अयशस्वी करून टाकलं. पाकिस्तान त्यांनी ठरवलेल्या कोणत्याही टार्गेवर हल्ला करू शकला नाही. पाकिस्तानच्या या हल्ल्यांत भारताच्या कोणत्याही मौल्यवान आणि महत्त्वाच्या मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, अशी मोठी माहितीही त्यांनी दिली. तसेच, पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला रोखण्यात आलं, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
