
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या मोरक्को दौऱ्यावर असून नुकतेच ते कासाब्लांका येथे पोहोचले. भारत आणि मोरोक्कोमधील संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने ही भेट एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री द्विपक्षीय चर्चेत सहभागी होणार असून संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. मात्र, त्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला. पाकिस्तानला सुधारणं, त्यांना वठणीवर आणणं हे आपलं काम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी ऑपरेशन सिंदूर भाग 2 आणि 3 असेल, असं ते म्हणाले.
मोरोक्कोमधील भारतीय समुदायाशी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “पहलगाममध्ये आपल्या माणसांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं. (त्यानंतर) मी एक बैठक बोलावली आणि त्यांना ऑपरेशनसाठी तयार राहण्यास सांगितले. सर्व प्रमुखांनी सांगितले की ते ऑपरेशनसाठी तयार आहेत.” त्या ऑपरेशननंतर पाकिस्तान म्हणालं की आम्हाला सीझफायर हवं आहे. शेजारच्या देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. मित्र बदलू शकतात, पण शेजारील देश बदलता येत नाहीत. आपल्या शेजाऱ्यांना योग्य मार्गावर परत आणणे ही आपली जबाबदारी आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. आम्ही त्यांनाही योग्य मार्गावर परत आणत आहोत. एवढंच नव्हे तर ऑपरेशन सिंदूर पुढे ढकलण्यात आले आहे आणि गरज पडल्यास ते पुन्हा सुरू केले जाईल असंही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी ऑपरेशन सिंदूर पार्ट 2-3 होईल
“ऑपरेशन सिंदूरचा दुसरा आणि तिसरा भाग अजूनही प्रलंबित आहेत. ते त्यांच्या (पाकिस्तानच्या) वर्तनावर अवलंबून आहे. जर त्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला तर त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल.” असे राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.
PoK आपोआप भारतात होईल सामील
ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण मंत्री म्हणाले, “आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या कर्मामुळे मारलं. आम्ही कोणाचाही धर्म विचारला नाही”. “प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्मांचे पालन करतो. आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही” असंही ते पुढे म्हणाले.
पीओके (पाकव्याप्त काश्मीर) स्वतःहून येईल; काळजी का करायची? पीओकेमध्ये मागणी आहे. पीओकेवर आक्रमण करून ते ताब्यात घेण्याची गरज नाही. ते आपलंच आहे. भविष्यात पीओकेचे लोक स्वतः म्हणतील, “मीही भारत आहे.” असंही त्यांनी नमूद केलं.
मोरोक्कोचाही विश्वासघात नको – संरक्षण मंत्री
भारतीय समुदायाशी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “भारताबद्दलचा आपला आदर, आपुलकी आणि प्रेम नैसर्गिक आहे. आपण जगात कुठेही असलो तरी आपण भारतीय आहोत हे कधीही विसरू नये.आपण भारतीय असल्याने आपल्या जबाबदाऱ्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. जर आपण मोरोक्कोमध्ये राहत असू, पैसे कमवत असू आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असू, तर मोरोक्कोचा विश्वासघात होऊ नये. हे भारताचे वैशिष्ट्य आहे.” असं त्यांनी नमूद केलं.