
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला आहे. संरक्षण मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की, मी माझ्या सौनिकांसोबत मिळून देशाच्या सीमेचं रक्षण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात नागरिकांना जसं वाटतं तसंच होणार असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ते बक्करवाल येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन संस्कृती जागरण महोत्सवात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह?
या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, माझ्या देशाकडे जे वाकड्या नजरेनं बघतील त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणं हे संरक्षण मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे. तुम्ही सर्व जण आपल्या पंतप्रधानांना चांगलंच ओळखतात. त्यांची कार्यपद्धती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे जोही कोणी आपल्या देशाकडे वाईट नजरेनं बघेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमची जशी इच्छा असेल तसंच होईल. 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र बनेल.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला संगळ्यांनाच माहिती आहे की, 2047 पर्यंत भारताला विकसीत देश बनवण्याचं लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे. हे लक्ष्य काही छोटं लक्ष्य नाहीये. मात्र तुम्ही सर्व निश्चित राहा. हे लक्ष्य आता लवकरच पूर्ण होणार आहे, आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताची उंची वाढली आहे. यापूर्वी भारत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्थरावर बोलत होता, तेव्हा भारताचं बोलणं गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं.भारत एक कमजोर देश आहे, गरीबांचा देश आहे, असं म्हटलं जायचं. मात्र आता जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय मंचावर बोलतो, तेव्हा सर्व जगाचं त्याकडे लक्ष असतं.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, या प्रकरणात आतापर्यंत अनंतनागमधील 25 पेक्षा जास्त लोकल टूरिस्ट गाईडची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी समितीचं असं म्हणणं आहे की, हा हल्ला स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय होणं अशक्य आहे. त्यामुळे आता जिथे हल्ला झाला त्या भागामध्ये चौकशी सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कठोर पाऊलं उचलली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तीन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना त्यांनी विचार देखील केला नसेल अशी शिक्षा मिळेल असं मोदींनी म्हटल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.