
तमिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघमचा(DMK) सहकारी पक्ष विदुथलै चिरुथैगल काचीचे(VCK) नेते वन्नियारासू यांनी एका कार्यक्रमात एक जाहीर वक्तव्य केले आहे. हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारत आणि ब्राह्मणवादाची विचारसरणीच ऑनर किलिंगसाठी कारणीभूत ठरल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. या ग्रंथातील कथा या जातीय हिसेंवर आधारीत आहेत. या महाकाव्यातील कथा या जातीय हिंसाचाराला वैधता देत असल्याचा दावाही वन्नियारासू यांनी केला. रामायणात तर हेच विचार असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढावून घेतला.
वन्नियारासू यांनी रामायणातील एका प्रसंगाचा दाखला देत ऑनर किलिंगचा विषय काढला. रामायणात एक ब्राह्मण आपल्या मृत मुलाला प्रभू रामाकडे घेऊन जातो. त्यांच्यावर प्रशासनाच्या अपयशाचे खापर फोडतो. प्रभू राम त्यावर काय झाले असे विचारणा करतात. तुमची प्रशासकीय व्यवस्था बिघडली आहे. तुमचा राजधर्म बिघडला आहे. परिणामी वारंवार वाईट घटना घडत आहेत. राम यामुळे याविषयी त्याच्याकडून अधिक माहिती घेतात.
प्रभू राम त्या ब्राह्मणासोबत जंगलात जातात. तिथे संपुहन ही आदिवासी व्यक्ती उलटे होऊन तप करताना त्यांनी दिसते. एक खालच्या जातीतील व्यक्ती तप कसा करू शकतो अशी विचारणा राम करतात. त्यानंतर राम तलवार काढून संपुहन यांचे धड वेगळे करतात. संपुहनचे रक्त त्या ब्राह्मण मुलाच्या मृत शरीरारावर शिंपडतात आणि तो जिवंत होतो, अशी कथा व्हीसीकेचे नेते वन्नियारासू यांनी सभेत सांगितली. या कथेवरून व्हीसीके नेत्याने असा तर्क दिला की, ही कथा अंतरजातीय लग्नातील हिंसेला प्रोत्साहन देते. सनातन धर्मातील वर्णाश्रम विचारधारा ही हिस्सेवर आधारीत आहे. ऑनर किलिंगच्या मागे एक विचारधारा आहे. ती सनात आणि वर्णाश्रम ही विचारधारा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे, हीच विचारधारा नष्ट करू, संपवू इच्छित होते.
भाजपची तिखट प्रतिक्रिया
वन्नियारासू यांच्या वक्तव्यानंतर तामिळनाडूचे भाजपचे माजी अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आक्षेप घेतला. डीएमके आणि त्यांचे सहकारी पक्ष सनातन धर्माविरोधात द्वेष पसरवत असल्याचे ते म्हणाले. रामायणचा ऑनर किलिंगशी काय संबंध आहे? इंडिया आघाडीचे लोक त्यांचा सदसदविवेक बुद्धी गहाण टाकली आहे का? व्हीसीके नेते वन्नियारासू यांनी उत्तर कांडाचा जो उल्लेख केला. तो वाल्मिकी रामायणाचा भाग नाही. इतकेच काय तामिळ कवी कंबन यांच्या रामायणातही या कथेचा मागमूस नाही. तरीही भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचा जहरी टोला अन्नामलाई यांनी लगावला.