
आजकाल ऑनलाईन फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, ऑनलाईन फसवणूक करणारे सायबर फ्रॉड तुम्हाला गंडा कसा घालता येईल याच्याच शोधात असतात. ते नेहमी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधतात. कधी तुम्हाला बँकेतून बोलतो आहे, म्हणून कॉल करतात, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागतात, तुम्ही जर त्यांना ओटीपी, तुमचा पीन नंबर किंवा अन्य कोणतीही माहिती दिली तर तुमचं बँक खात रिकामं झालच म्हणून समजा. यांची आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला ते कमी पैशांमध्ये जास्त पैसे मिळून देण्याचं अमिष दाखवतात त्यांच्या या भूलथापांना देखील अनेक लोक बळी पडतात.
नुकतीच अशीच एक बनावट वेबसाईट व्हायरल झाली आहे, ज्या वेबसाईटकडून असा दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिवसाला दहा हजार रुपये कमावण्याची संधी मिळू शकते. मात्र प्रेस सूचना ब्यूरो (PIB) फॅक्ट चेककडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. पीआयबीनं ही वेबसाईट बनावट असल्याचं म्हटलं आहे.
PIB नं काय म्हटलं
पीआबी फॅक्ट चेक मध्ये असं म्हटलं आहे की, ही वेबसाईट बनावट असून, चुकीचा दावा करत आहे. कोणीही या दाव्याला बळी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाहीये. या वेबसाईटकडून असा दावा करण्यात आला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक योजना सुरू केली आहे, ही योजना सुरू झाल्यानंतर लोकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत. तुम्ही देखील या योजनेच्या माध्यमातून दिवसाला दहा हजार रुपये कमावू शकतात.
दरम्यान पीआयबी फॅक्ट चेककडून या दाव्याचं खंडण करण्यात आलं आहे. ही वेबसाईट बनावट असल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी सावध राहावं कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. यामुळे तुमची मोठी फसवणूक होऊ शकते असं आवाहन पीआयबीकडून करण्यात आलं आहे.