राम श्रीमंतांचा देव, तर शिव गरीबांचा… मुख्यमंत्र्यांनी केली देवांची विभागणी; भाजपवर प्रभू रामाच्या चोरीचा आरोप
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 'प्रभू राम श्रीमंतांचा देव, तर शिव गरिबांचा' असे वादग्रस्त विधान केले आहे. भाजपने श्रीरामाची चोरी केल्याचा आरोप करत त्यांनी देवांची राजकीय विभागणी केली. या वक्तव्यामुळे देशभरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, भाजपनेही रेड्डींच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भगवान शिव आणि प्रभू श्रीरामाबद्दल मोठं विधान केलं आहे. प्रभू राम हा श्रीमंतांचा देव आहे. तर शिव हा गरीबांचा देव आहे, अशी देवांमध्ये विभागणी करतानाच भाजपने श्रीरामाची चोरी केली आहे. त्यामुळेच भाजपला उत्तरेत यश आलं आहे. तर काँग्रेसला दक्षिणेत यश आल्याचा दावा रेवंत रेड्डी यांनी केला आहे. ए. रेवंत रेड्डी यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. थेट देवांचीच विभागणी केल्याने रेड्डी यांच्यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत एका मीडियाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी थेट देवांमध्येच विभागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेस मुख्यत्वे दक्षिणेकडील राज्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. कारण भाजपने भगवान श्रीरामाची चोरी केली आहे. उत्तरेमध्ये श्रीरामबद्दल एक भावना आणि आस्थेचा विषय आहे, असं सांगतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दोन्ही देवांची तुलना केली आहे. तसेच भाजप जय श्रीरामचा नारा वापरत असल्याचा आरोपही रेवंत रेड्डी यांनी केला आहे.
आम्ही द्रविड, ते…
आम्ही द्रविड आहोत. उत्तरेतील लोक आर्य आहेत. आम्ही शिवभक्त आहोत. ते राम भक्त आहेत. भाजपने रामाची चोरी केली आहे. मोदी हर हर महादेव का म्हणत नाहीत? कधी भाजपच्या लोकांनी मंचावरून हर हर महादेवचा नारा दिला आहे का? ते फक्त जय श्रीराम म्हणतात. आम्ही हर हर महादेव म्हणतो, ते त्यांना आवडत नाही, असा दावा रेवंत रेड्डी यांनी केलाय.
भाजपची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी रेवंत रेड्डी यांच्या विधानावर टीका केली आहे. संजय कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रेवंत रेड्डी यांच्यावर टीका केली आहे. आधी रेवंत रेड्डी म्हणाले होते, मुस्लिम हीच काँग्रेस आहे. काँग्रेस हीच मुस्लीम आहे. आता भगवान राम आणि शिव यांच्या नावाने राजकीय वाद निर्माण करत आहेत, असं बंदी संजय कुमार यांनी म्हटलंय.
तेलंगणात वेमुलावाडामध्ये दक्षिण काशी आणि भद्राचलममध्ये दक्षिण आयोध्या आहे. त्यामुळे रेवंत रेड्डींनी भगवान राम आणि भगवान शिव यांना उत्तर आणि दक्षिणेत विभागण्याचं काम बंद करावं, असा सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. काशी विश्वनाथ हे वाराणासीचं आध्यात्मिक केंद्र आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
एसआयआरवर काय म्हणाले?
यावेळी रेवंत रेड्डी यांनी एसआयआरवर प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्याच्या काळात सायमन गो बॅकचा नारा देत जसं आंदोलन झालं होतं, तसंच मोठं आंदोलन एसआयआरच्या विरोधात होणार आहे. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि एम के स्टालिन यांच्यासहीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्रित येऊन सायमन गो बॅकसारखं ‘एसआयर गो बॅक’चं आंदोलन सुरू केलं पाहिजे, असं आवाहन रेड्डी यांनी केलं. एसआयआरचा अर्थ मत चोरी करणं आणि भाजपला फायदा पोहोचवणं आहे. केंद्रात संरक्षण, गृह आणि वाणिज्य विभाग अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व विभाग उत्तर भारतातील नेत्यांकडे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.