
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाची आजपासून सुरूवात होत आहे. त्याच निमित्ताने राजधानी दिल्लीत आज, 26 ऑगस्टपासून तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान भवन येथे पार पडणाऱ्या विशेष कार्यक्रमाची, ‘आरएसएसचा 100 वर्षांचा प्रवास: नवे क्षितिज’ अशी थीम आहे. विविध माध्यमं तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाणार आहे.
व्याख्यानमालेत कसा असेल कार्यक्रम ?
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या व्याख्यानमालेचे नेतृत्व करणार असून ते विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी स्वत: संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम संवादात्मक स्वरूपात तयार करण्यात आला आहे, जेणेकरून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लोकंही प्रश्न विचारू शकतात. या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ,मान्यवर नेते देखील उपस्थितांना संबोधित करतील.तसेच विविध विषयांवर संघटनेचे विचार आणि दृष्टिकोन ते मांडतील.
लाइव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था
राष्ट्रीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ही व्याख्यानमाला केंद्रित असेल. या व्याख्यानमालेत होणारी सत्रं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत फेसबुक पेजसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाबद्दल चर्चा करणे तसेच ही संघटना नव्या सामाजिक आणि राष्ट्रीय क्षितिजांकडे कशी वाटचाल करत आहे हे दाखवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमामुळे संघाचा इतिहास समजून घेण्याची संधी तर मिळेलच, शिवाय भविष्यासाठी संघाचे दृष्टिकोनही त्यात मांडले जातील.
RSS च्या माध्यम प्रमुखांनी काय सांगितलं ?
तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत, मोहन भागवत हे समाजातील विविध प्रख्यात व्यक्तींशी संवाद साधतील आणि देशासमोरील “महत्त्वाच्या मुद्द्यांवर” त्यांचे विचार मांडतील असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रचार आणि माध्यम प्रमुख सुनील आंबेकर यांनी कार्यक्रमाबद्दल पत्रकारांना सांगितलं. ते( मोहन भागवत) देशाच्या भविष्यासाठी आरएसएसचे दृष्टिकोन मांडतील आणि येत्या काळात संघटना आपली “ऊर्जा” कुठे केंद्रित करेल आणि स्वयंसेवकांना कोणत्या प्रकारचे काम करण्यास सांगितले जाईल हेही लोकांसमोर मांडतील, असेही आंबेकर यांनी नमूद केलं.