संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

"आपल्या संबोधानात रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं. दलित विरोधी आरोपांवर अटली जींनी स्पष्ट केलं होतं की, 'आम्ही मनुस्मृतीचे नाही, भीम स्मृतीचे अनुयायी आहोत" असं रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केलं.

संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही - माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
ramnath kovind
| Updated on: Oct 02, 2025 | 11:35 AM

दरवर्षी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होतो. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे. दरवर्षी संघाच्या मेळाव्याला एका प्रमुख पाहुण्याला बोलवण्यात येतं. यंदाच्या मेळाव्याला रामनाथ कोविंद विशेष अतिथी होते. ‘संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही’, असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. नागपूरच्या ऐतिहासिक रेशीम बाग मैदानातून मुख्य अतिथी म्हणून रामनाथ कोविंद संबोधित करत होते. ‘आपल्या जीवनात नागपूरच्या दोन महान व्यक्तींच महत्वाच योगदान आहे’ असं रामनाथ कोविंद या प्रसंगी म्हणाले.

“माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांनी अमीट छाप उमटवली. यात एक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. माझ्या जीवनात या दोन महान व्यक्तींच विशेष योगदान राहिलं आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत, तर डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी देशाला समृद्ध संविधान दिलं. त्यामुळे मी एक सामान्य माणूस असूनही देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचू शकलो” असं रामनाथ कोविंद म्हणाले.

सर्व वर्गांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला

“डॉ. आंबेडकरांच्या चिंता आणि विचार प्रक्रिया डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्याच होत्या. डॉ. आंबेडकरांनी ज्या प्रमाणे समाजाच्या सर्व वर्गांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तसच संघाने सुद्धा एकात्मता स्त्रोत्राच्या माध्यमातून हाच संदेश दिला. संघाचा समावेशी दृष्टीकोन याचं प्रमाण आहे” असं रामनाथ कोविंद म्हणाले. ‘आपल्या या एकतेच्या आधाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी inherent cultural unity म्हटलं आहे’ असं कोविंद म्हणाले.

‘आम्ही मनुस्मृतीचे नाही, भीम स्मृतीचे अनुयायी आहोत’

माजी राष्ट्रपती म्हणाले की, डॉ. हेडगेवारांनी संघाच्या स्थापनेसाठी शुभ आणि सार्थक दिवस निवडला. आपल्या संबोधनात माजी राष्ट्रपतींनी डॉक्टर हेडगेवारांपासून मोहन भागवतांपर्यंत संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सरसंघचालकांच्या योगदानाची माहिती दिली. आपल्या संबोधानात रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं. दलित विरोधी आरोपांवर अटली जींनी स्पष्ट केलं होतं की, ‘आम्ही मनुस्मृतीचे नाही, भीम स्मृतीचे अनुयायी आहोत’ असं रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केलं.

संघ सामाजिक एकतेचा पक्षधर

संघाशी पहिल्यांदा संबंध आला, त्या क्षणांना सुद्धा कोविंद यांनी उजाळा दिला. 1991 साली ते कानपूरच्या घाटमपुर विधानसभा क्षेत्रातून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढत होते. त्यावेळी ते भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान संघाचे अधिकारी आणि स्वयंसेवकांशी त्यांचा संबंध आला होता. ‘संघाच्या लोकांनी कुठलाही जातीय भेदभाव न बाळगता प्रचार केला होता’ असं कोविंद म्हणाले. ‘संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही, संघ सामाजिक एकतेचा पक्षधर आहे’ असं कोविंद यांनी सांगितलं.