सृष्टीची निर्मिती, संवर्धन आणि पोषण मातृत्वाशिवाय शक्य नाही – डॉ मोहन भागवत
विश्वमांगल्य सभेतर्फे आयोजित ‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावरील प्रबोधन बैठकीच्या समारोप सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मातृत्वाच्या शाश्वत महत्त्वावर भाष्य केले.

नवी दिल्ली, 24 जुलै 2026 : विश्वमांगल्य सभेतर्फे आयोजित ‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावरील प्रबोधन बैठकीच्या समारोप सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मातृत्वाच्या शाश्वत महत्त्वावर भाष्य केले. ते म्हणाले की, ‘मातृत्व या विषयावर मला बोलण्यास सांगणे हे स्वतःमध्येच एक विरोधाभास आहे. कारण या विषयावर महिलांचाच नैसर्गिक अधिकार आहे. पुरुषांनी यावर बोलणे योग्य वाटत नाही. मात्र, विश्वमांगल्य सभेने या विषयावर सखोल चर्चा केली असून आपल्या परंपरा, आजच्या काळातील गरजा आणि भविष्यातील दिशा यावर अनेक महान विचारवंतांनी चिंतन केले आहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या महापुरुषांनीही या विषयावर व्यापक विचार मांडले आहेत.’
भागवत पुढे म्हणाले, युगानुकूल मातृत्व हा विषय जरी काळानुरूप मांडला गेला असला, तरी मातृत्वाची शाश्वत तत्त्वे कधीही बदलत नाहीत. उलट त्या मूल्यांमधूनच युगपरिवर्तन घडविणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होतात. आदिकाळापासून संपूर्ण सृष्टी मातृत्वाच्या आधारावरच टिकून आहे. प्रत्येक जीवाच्या जन्मामध्ये मातृत्वाचा सहभाग असतो. सृष्टीची निर्मिती, संवर्धन, पोषण आणि सातत्य हे मातृत्वाशिवाय अशक्य आहे. मानवाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची विचारशक्ती, परंतु त्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कार्य आई करते. आई ही प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु असते आणि आयुष्यभर भावनिक आधार देणारे सर्वात मोठे केंद्रही तीच असते.
कुटुंबात संवाद आणि वेळ देणे आवश्यक
भागवात यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘आजच्या काळात कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वेळ देणे आणि सातत्याने संवाद ठेवणे ही सर्वात मोठी गरज आहे. मुलांच्या प्रश्नांची आणि जिज्ञासांची उत्तरे पालकांनीच दिली पाहिजेत. त्यासाठी पालकांनी स्वतःचे ज्ञान सातत्याने वाढविणे आवश्यक आहे. मुलं उपदेशापेक्षा अनुकरणातून अधिक शिकतात, त्यामुळे पालकांनी स्वतः आदर्श आचरण ठेवले पाहिजे.
भारतीय संस्कृतीबाबत पसरवलेल्या भ्रमांपासून सावध राहण्याचे आवाहन
डॉ. भागवत म्हणाले की, समाजात अनेक वाद-विवाद हे गैरसमजांमुळे निर्माण होतात आणि अनेकदा जाणीवपूर्वकही भ्रम निर्माण केला जातो. भारतीय संस्कृतीबाबतही अनेक वर्षे चुकीच्या समजुती पसरवण्यात आल्या की आपल्या परंपरा कालबाह्य आहेत. मात्र, भारतीय संस्कृतीचा पाया अत्यंत भक्कम आणि अनुभवाधिष्ठित आहे. त्यामुळे आपल्या इतिहासावर, ज्ञानपरंपरेवर आणि संस्कृतीवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची गरज आहे.
भारतीय जीवनमूल्यांनुसार जगण्याचे आवाहन
पुढे बोलताना भागवत म्हणाले की, ‘एकता हेच सत्य आहे आणि विविधतेत एकात्मता हा भारतीय संस्कृतीचा मूलभूत संदेश आहे. भारतात राहून भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांनुसार जीवन जगले पाहिजे. इतर देशांची जीवनशैली विचार न करता स्वीकारण्याऐवजी भारतीय दृष्टिकोनातून समाज आणि कुटुंबव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे.
900 हून अधिक प्रबुद्ध मातृशक्तीची उपस्थिती
या प्रबोधन बैठकीचा समारोप आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झाला. मातृनिर्माणातून राष्ट्रनिर्माण या ध्येयाने कार्यरत असलेल्या विश्वमांगल्य सभा या जागतिक महिला संघटनेतर्फे उत्तर भारतातील राष्ट्रीय प्रबोधन बैठक 23 आणि 24 जुलै रोजी विश्व युवक केंद्र येथे आयोजित करण्यात आली.
दोन दिवसांच्या या बैठकीत विविध राज्यांतील सुमारे 280 महिलांनी सहभाग घेतला. ‘युगानुकूल मातृत्व हा मुख्य विषय होता. बदलते सामाजिक वातावरण, भारतीय कुटुंबव्यवस्था आणि आजच्या काळातील मातृत्वाची भूमिका यावर व्यापक विचारमंथन करण्यात आले. समारोप सत्रात विविध क्षेत्रांत कार्यरत 900 हून अधिक प्रबुद्ध मातृशक्ती उपस्थित होती. तसेच युगानुकूल मातृत्व या विषयावरील संवादासाठी 2,000 ते 2,500 महिलांनी नोंदणी केली होती.
23 प्रांतांत अधिवेशने, 37 हजार महिलांचा सहभाग
2026 मध्ये विश्वमांगल्य सभेने देशातील 23 प्रांतांमध्ये अधिवेशने आयोजित केली असून त्यामध्ये सुमारे 37 हजार महिलांनी सहभाग घेतला. या अधिवेशनांमध्ये भारतीय कुटुंबव्यवस्था, मातृत्वाची बदलती भूमिका आणि भावी पिढीच्या संस्कारनिर्मितीवर विशेष चर्चा करण्यात आली. सध्या विश्वमांगल्य सभा भारतातील 33 प्रांतांमध्ये कार्यरत असून सुमारे 6 लाख मातृशक्ती या संघटनेशी जोडलेली आहे. शिक्षण, संस्कार, सामाजिक जागृती आणि सेवाकार्यात त्या सक्रियपणे योगदान देत आहेत. भारतासह अमेरिका, नेदरलँड्ससह 14 देशांमध्येही संघटनेच्या कार्याचा विस्तार झाला आहे.
महिलांच्या नेतृत्वातून राष्ट्रनिर्माणाचा संकल्प
विश्वमांगल्य सभेच्या मते, प्रत्येक महिला ही अशा मातृत्वशक्तीचे प्रतीक आहे जी कुटुंब, समाज आणि राष्ट्रनिर्मितीची भक्कम पायाभरणी करते. महिलांमध्ये कर्तव्यभावना, सांस्कृतिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करणे, तसेच संस्कारित पिढी घडवून सशक्त, समरस आणि आत्मविश्वासपूर्ण भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
2010 मध्ये नागपूर येथे स्थापना
विश्वमांगल्य सभेची स्थापना 19 फेब्रुवारी 2010 रोजी नागपूर येथे परमपूज्य आचार्य स्वामी जितेंद्रनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ते 600 वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या श्री दत्त पीठाचे 18 वे पीठाधीश्वर आहेत. संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवा या चतुःसूत्री तत्त्वांवर कार्य करणारी ही संघटना मातृशक्तीला संघटित करून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला बळकटी देत आहे.