सर्व पक्षांनी मतभेद विसरून दहशतवादी हल्ल्याचा निषेध करावा- दत्तात्रय होसबळे
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हादरला आहे. या हल्ल्यात एकूण 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हादरला आहे. या हल्ल्यात एकूण 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये काही परदेशी नागरिकही आहेत. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध घेला आहे. दहशदवादी हल्ल्याच्या घटनेनंतर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व राजकीय पक्ष आणि संस्थांनी मतभेद मागे टाकून या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असे आवाहन केले आहे.
हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यावर लवकर कारवाई करावी- होसबळे
होसबळे यांनी या हल्ल्यातील पीडित तसेच त्यांच्या कुटुंबीयांची मदत करण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
होसबळे नेमकं काय म्हणाले?
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर होसबळे यांची प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली आहे. यात “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय आणि दुःखद आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. हा हल्ला म्हणजे देशाची एकता आणि अखंडता यावर आघात करण्याचे धाडस आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संस्थांनी सर्व मतभेद विसरून याचा निषेध केला पाहिजे. सरकारने सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. तसेच, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा देण्यासाठी त्वरित योग्य पावले उचलावी,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी दिली.
जम्मू कश्मीर के पहलगाम में पर्यटकों पर हुआ नृशंस आतंकी हमला अत्यंत निंदनीय एवं संतापजनक है। हम घटना में मृत हुए सभी के प्रति श्रद्धांजलि अर्पित करते हैं तथा घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करते हैं। यह हमला देश की एकता व अखंडता पर प्रहार करने का दुःसाहस है। सभी राजनीतिक दल…
— RSS (@RSSorg) April 22, 2025
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मरीमधील पहलगाम या भागात अचानकपणे काही शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात अनेक पर्यटक जखमी झाले. तर एकूण 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. जखमी पर्यटकांमधील काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. ते तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
