
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आम्ही भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत असल्याची घोषणा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीयेत, तर सातत्यानं अमेरिकेकडून आता भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. व्हिसाबाबत देखील काही महत्त्वाचे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहेत. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात करत असल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्यानं करण्यात येत आहे. मात्र तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरू ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतानं काही प्रमाणात रशियाकडून तेलाची खरेदी कमी केली आहे, त्याचं मुख्य कारण हे देखील आहे की, सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये एका महत्त्वाच्या व्यापारी डीलवर बोलणं सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारताची अमेरिकेत होणारी निर्यात देखील घटली आहे. तर दुसरीकडे मात्र अमेरिकेसोबतच्या व्यापारावर परिणाम झाल्यानंतर आता भारताची रशिया आणि चीनसोबतची जवळीक वाढली आहे. भारताच्या रशिया आणि चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावून देखील त्याचा विशेष काही प्रभाव भारतावर पडल्याचं दिसून येत नाहीये.
दरम्यान काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. पुतिन यांच्या दौऱ्यावेळी रशिया आणि भारतात अनेक महत्त्वाचे करार झाले. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियानं भारताला सुपरजेट -100 आणि Il-114-300 या दोन प्रवासी विमानाची ऑफर दिली आहे. ही दोन्ही विमानं रशियन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. ही विमान भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात असं रशियानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यातील सुपरजेट -100 विमानाच्या आतील बाजुस भारताच्या तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.