
रशियाने भारताला सुपरजेट -100 आणि Il-114-300 या दोन प्रवासी विमानाची ऑफर दिली आहे. हे दोन्ही विमानं रशियानं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहेत. एवढंच नाही तर या विमानावर रशियानं तिरंगी ध्वजाची प्रतिकृती देखील तयार केली आहे. ही विमानं भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात, असं देखील रशियानं म्हटलं आहे. दरम्यान भारत अजूनही विमानाच्या बाबतीमध्ये पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहे, मात्र जर भारतानं रशियासोबत या विमानांची डील केली तर भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. स्पुटनिकच्या एका रिपोर्टानुसार रशियाच्या उद्योग मंत्रालयाने युनायटेड इंजिन कॉर्पोरेशन द्वारे तयार करण्यात आलेल्या सुपरजेट 100 विमानच्या आतील भागाचे फुटेज शेअर केले आहेत, या विमानाच्या आतील भागामध्ये तिरंगी ध्वजाची प्रतिकृती साकरण्यात आली आहे, रशियाकडून या विमानाची भारताला ऑफर देण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंध प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत, अमेरिकेमधील भारताची निर्यात देखील कमी झाली आहे, मात्र दुसरीकडे आता भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. अमेरिकेसोबतची निर्यात कमी झाल्यानंतर भारताच्या चीन आणि रशियासोबत होणाऱ्या निर्यातीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भारताची चीन आणि रशियासोबत वाढत असलेली जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. दरम्यान त्यानंतर आता रशियानं भारताला थेट सुपरजेट -100 आणि Il-114-300 सारख्या विमानांची ऑफर दिल्यानं अमेरिकेचा जळफळाट आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि रशिया भारताकडून मिळालेल्या पैशांचा उपयोग हा युक्रेनविरोधात युद्ध फंड म्हणून वापरतो असा अमेरिकेचा आरोप आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी मागणी अमेरिकेनं केली होती, मात्र तरी देखील भारतानं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवल्यानं अखेर गेल्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली होती.